केर्बरला नमवून सिबुलकोवा चॅम्पियन
By admin | Published: November 1, 2016 02:06 AM2016-11-01T02:06:41+5:302016-11-01T02:06:41+5:30
विश्व क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अँजेलिक केर्बर हिच्यावर सलग सेटमध्ये ६-३, ६-४ ने विजय साजरा करीत मोसमातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.
सिंगापूर : स्लोव्हाकियाची डोमिनिका सिबुलकोवा हिने शानदार कामगिरीसह विश्व क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अँजेलिक केर्बर हिच्यावर सलग सेटमध्ये ६-३, ६-४ ने विजय साजरा करीत मोसमातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली.
२०१४ ची आॅस्ट्रेलियन ओपनची उपविजेता सिबुलकोवा आठवडाभरापूर्वी राऊंड रॉबिन सामन्यात केर्बरकडून पराभूत झाली होती. सिंगापूरमध्ये पराभवाची परतफेड करीत महिला एकेरीचे जेतेपद पटकविले. यंदा आॅस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम जिंकताच अमेरिकेची सेरेना विलियम्स हिला मागे टाकून केर्बर विश्व क्रमवारीत नंबर वन बनली होती. केर्बरला डब्ल्यूटीए जेतेपदाची देखील प्रबळ दावेदार समजले जात होते. पण अंतिम सामन्यात २८ वर्र्षांच्या सिबुलकोवाला रोखण्यात तिला अपयश आले.
राऊंड रॉबिन फेरीत सुरुवातीचे दोन्ही सामने गमविणाऱ्या स्लोव्हाकियाच्या सिबुलकोवाने नंतर तिन्ही सामने जिंकून ज्यो किंग ट्रॉफीसोबत २०.५ लाख डॉलरची रक्कम जिंकली. या कामगिरीसाठी सिबुलकोवाला ‘डब्ल्यूटीए कमबॅक प्लेअर आॅफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. महिला दुहेरीत आॅलिम्पिक चॅम्पियन जोडी रशियाची एकातेरिना माकारोवा- एलिना व्हेस्रिना यांनी अमेरिकन ओपन विजेती जोडी बेथानी माटेक सॅन्डस्- ल्यूसी सफारोवा या जोडीवर ७-५, ६-३ असा विजय नोंदवित जेतेपदाचा मान मिळविला.(वृत्तसंस्था)