सिटी अजूनही विजेतेपदाच्या शर्यतीत
By admin | Published: March 18, 2017 12:40 AM2017-03-18T00:40:21+5:302017-03-18T06:03:08+5:30
प्रीमियर लीग विजेतेपद पटकावण्याच्या शर्यतीतून मँचेस्टर सिटी अजिबात बाहेर पडले नसल्याचे ठाम मत संघाचा स्टार मिडमिल्डर याया टौरे याने मांडले. त्याचवेळी सिटीचा
- याया टौरे याच्याशी बातचित
प्रीमियर लीग विजेतेपद पटकावण्याच्या शर्यतीतून मँचेस्टर सिटी अजिबात बाहेर पडले नसल्याचे ठाम मत संघाचा स्टार मिडमिल्डर याया टौरे याने मांडले. त्याचवेळी सिटीचा आगामी सामना अव्वल चार प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या लिव्हरपूलविरुध्द होणार असून यासाठी आम्ही पुर्णपणे सज्ज असल्याचेही यायाने म्हटले आहे. सिटी संघात मुख्य मध्यरक्षक म्हणून खेळण्याची जबाबदारी मिळाल्यापासून याया संघाचा महत्त्वाच भाग बनला आहे. त्याच्या निर्णायक कामगिरीमुळे संघाचे आक्रमण जबरदस्त सुधारले आहे. त्यात आगामी लिव्हरपूलविरुध्दच सामना सिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून यामध्ये बाजी मारल्यास मँचेस्टर सिटी गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी पोहचतील. परंतु, त्यांच्यासाठी सर्वात मोठी अडचण ठरेल ती चेल्सीची. अग्रस्थानी असलेल्या चेल्सीने स्पर्धेत मोठी आघाडी घेतली असून सिटीने दुसरे स्थान मिळवले तरी, त्यांच्यात व चेल्सीमध्ये मोठे अंतर राहिल. या सामन्याआधी यायानेही कोणतीही गोष्ट असाध्य नाही असे सांगत रणशिंग फुंकले आहे...
मँचेस्टर सिटीने नुकताच मोनॅकोविरुध्द शानदार खेळ केला. त्याच खेळाची लिव्हरपूलविरुध्द अपेक्षा करु शकतो का?
- नक्कीच. आम्ही चांगल्या लयीमध्ये असून हाच खेळ आम्हाला कायम ठेवायचा आहे. जर का हीच कामगिरी आम्ही कायम राखली, तर आमच्या पाठिराख्यांमध्ये निश्चित वाढ होईल.
आक्रमकतेने खेळण्याची रणनिती टीम मॅनेजरची आहे का?
- हो. सुरुवातीपासून आम्ही आक्रमक खेळ करुन गोल केले आहेत. संघाचे नवीन मॅनेजर आक्रमक रणनितीचे आहे. काहीवेळा खेळताना चुका होतात. पण, हे सर्व खेळाचा एक भाग आहे. जर तुम्ही चुकत नसाल तर तुम्ही फुटबॉल कधीच शिकणार नाही.
अनेकांच्या मते, अशा प्रकारे खेळत राहिल्यास सिटी जेतेपद जिंकणार नाही. काय सांगशील?
- नक्कीच आम्ही अशा प्रकारे खेळून ट्रॉफी जिंकू शकतो. आम्हाला माहितेय आम्ही गोल केलेत आणि तोच खेळ आम्हाला कायम ठेवायचा आहे. क्लबने आमच्यासाठी खूप पैसा ओतलाय आणि तो विश्वास आम्हाला गमवायचा नाही. आमच्याकडे मोठे खेळाडू असून आम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकायच्या आहेत.
निराशाजनक कामगिरीनंतर सिटीने जबरदस्त पुनरागमन केले. याचे अधिक कौतुक झाले नाही असे वाटते का?
- कदाचित हो. पण कदाचित आमच्याकडे दाखवण्यासारखा इतिहास नाही म्हणून असे असेल. जेव्हा तुम्ही मँचेस्टर युनायटेडसारख्या संघाला पाहता, तेव्हा लोकांना त्यांच्याकडे बघून विश्वास वाटतो. कारण त्यांनी अनेकदा पिछाडीवरुन विजय मिळवलेला आहे. आमचे लक्ष केवळ सर्वोत्तम खेळ करण्यावर असून त्याआधारे आम्ही आमचा स्वत:चा इतिहास उभारु.
युनायटेड संघासारखंच एकदिवस सिटीदेखील मजल मारेल असे वाटते का?
- हो आणि त्यानुसार योजना आहेत. संघात कायम मोठ्या खेळाडूंना स्थान देऊन मोठ्या स्पर्धा जिंकायच्या हीच सिटीची योजना आहे. याजोरावर युनायटेड किंवा बार्सिलोनासारख्या संघात आमच्या संघाचे परिवर्तन करायचे आहे. यासाठीच मी या संघात आलो असून आम्ही आमचे सर्वोत्तम योगदान देत आहोत. (पीएमजी)