देशभरात होणार ‘प्रशिक्षक बँक’; राज्यवर्धन राठोड यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:59 AM2018-03-01T00:59:06+5:302018-03-01T00:59:06+5:30
पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल.
नवी दिल्ली : पायाभूत स्तरावर विविध खेळांतील प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि ओळख देण्याचा हेतू पुढे ठेवून क्रीडा मंत्रालय प्रशिक्षकांची बँक तयार करणार आहे. या प्रशिक्षकांना आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालय स्वत: प्रमाणपत्र देईल.
क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, ‘पायाभूत स्तरावर प्रशिक्षकांची फळी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षक योजना कार्यरत असेल. यात प्रशिक्षकांचे वर्गीकरण होईल. खेळाडूंना विकास प्रक्रियेत पायाभूत कोच विकासात्मक प्रशिक्षक आणि नंतर अनुभवी प्रशिक्षक लागतो. त्याच पद्धतीने प्रशिक्षकांची फळी निर्माण केली जाईल. आधी आम्ही विशेष प्रशिक्षक तयार करू. हे प्रशिक्षक पायाभूत स्तरावरील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील. तज्ज्ञ प्रशिक्षक हे एकप्रकारे ‘आयएसआय’मार्कसारखे असतील. यामुळे पालक, शाळा, कॉलेजेस अशा प्रशिक्षकांची सेवा विश्वासाने घेऊ शकतील. प्रशिक्षकांची बेसिक माहिती वेबसाईटवर उपलब्ध असेल. या प्रशिक्षकांनी रिफ्रेशर कोर्स कधी केला हे सहा- सहा महिन्यांच्या फरकाने अपडेट केले जाईल.’
कौशल्य विकास मंत्रालयाला या योजनेत सहभागी केले जात असल्याचे सांगून आॅलिम्पिक रौप्य विजेते नेमबाज राठोड पुढे म्हणाले,‘पुढील चार- पाच महिन्यात ही योजना मोठ्या स्तरावर लागू होईल. यासाठी अभ्यासक्रम तयार होत असून विदेशी एजन्सीची निवड केली जाईल. खेळाडूंचा विकास प्रशिक्षकांच्या विकासावर विसंबून असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.’
भारतात प्रशिक्षकांच्या विकासाचा ठोस कार्यक्रम नाही. विदेशी प्रशिक्षकांना करारबद्ध करतेवेळी ते भारतीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील अशी अट असते, पण त्याचे पालन होताना दिसत नाही. आता आम्ही विदेशी प्रशिक्षक भारतीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील याची खात्री करून, असे राठोड यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
प्रशिक्षकांना मिळणार प्रोत्साहन रक्कम : आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंच्या सुरुवातीच्या प्रशिक्षकाला प्रोत्साहन रकमेचा वाटा देण्याची घोषणा राठोड यांनी केली. एखाद्या खेळाडूने पदक जिंकल्यास पुरस्कार रक्कम त्याच्या सध्याच्या प्रशिक्षकाला दिली जात असे. पण यापुढे ५० टक्के रक्कम सध्याच्या कोचला, ३० टक्के विकासात्मक कोचला आणि २० टक्के रक्कम सुरुवातीच्या कोचला दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.