प्रशिक्षक तयार करत आहेत स्पर्धेचे वातावरण; वेगवेगळ्या खेळाडूंसह खेळतेय सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:11 AM2021-05-17T05:11:27+5:302021-05-17T05:11:45+5:30

पी. व्ही. सिंधू : कोरोना महामारीमुळे बॅडमिंटन जागतिक महासंघाला (बीडब्ल्यू  एफ) भारत, मलेशिया आणि सिंगापूर येथील तीन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या

The coaches are creating a competitive atmosphere; Matches played with different players PV Sindhu | प्रशिक्षक तयार करत आहेत स्पर्धेचे वातावरण; वेगवेगळ्या खेळाडूंसह खेळतेय सामने

प्रशिक्षक तयार करत आहेत स्पर्धेचे वातावरण; वेगवेगळ्या खेळाडूंसह खेळतेय सामने

googlenewsNext

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा पुन्हा एकदा क्रीडाविश्वाला फटका बसू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएल स्थगित करावी लागल्यानंतर, बॅडमिंटनमध्येही दोन महत्त्वपूर्ण स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. यामुळे ऑलिम्पिकच्या तयारीला लागलेल्या खेळाडूंच्या सरावाला फटका बसला; परंतु असे असले, तरी भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू मात्र निश्चिंत आहे. तिने सांगितले की, ‘रद्द झालेल्या स्पर्धांचा माझ्या तयारीवर कोणताही परिणाम न होऊ देण्यासाठी माझे प्रशिक्षक सराव सत्रादरम्यान स्पर्धेचे वातावरण निर्माण करत आहेत.’

स्पर्धा रद्द झाल्याचा ऑलिम्पिक तयारीवर कितपत फरक पडला याविषयी सिंधू म्हणाली की, ‘ऑलिम्पिकआधी सिंगापूर येथे अखेरची स्पर्धा होईल, असा आमचा विचार होता; परंतु आता आमच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे आता मी वेगवेगळ्या खेळाडूंसह सामने खेळतेय. यासाठी माझे प्रशिक्षक पार्क हे सराव सत्रादरम्यान एखाद्या स्पर्धेप्रमाणेच वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ सिंधू सध्या कोरियन प्रशिक्षक पार्क तेइ सेंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

सिंधूने पुढे म्हटले की, ‘प्रत्येक खेळाडूच्या खेळण्याची शैली वेगळी असते. ताय जू यिंग आणि रतचानोक इंतानोन यांची शैली एकमेकींच्या तुलनेत पूर्ण वेगळी आहे; पण सध्या प्रशिक्षक पार्क यांच्या मार्गदर्शनात माझी तयारी सुरू आहे. नक्कीच आम्ही खेळाडू मोठ्या कालावधीनंतर एकमेकांविरुद्ध खेळू.

कोरोना महामारीमुळे बॅडमिंटन जागतिक महासंघाला (बीडब्ल्यू  एफ) भारत, मलेशिया आणि सिंगापूर येथील तीन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. जुलै-ऑगस्ट महिन्यांत होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्वीच्या या तिन्ही स्पर्धा अंतिम पात्रता स्पर्धा होत्या. त्यामुळे अनेक खेळाडूंचा या निर्णयाचा फटका बसला आहे.

तेलंगणाच्या गचीबाउली बंदिस्त   स्टेडियममध्ये सिंधूचा स्वतंत्र सराव सुरू असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अन्य भारतीयांसोबत ती सराव करत नाही. सिंधूने बीडब्ल्यूएफच्या स्पर्धा रद्द करण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. ‘स्पर्धेत खेळायला मिळणार नाही, हे निराशाजनक आहे. संपूर्ण  जग ठप्प पडल्यासारखे झाले आहे. मात्र खेळाहून अ धिक महत्त्व आयुष्याला आहे,’ असे सिंधूने म्हटले.  

Web Title: The coaches are creating a competitive atmosphere; Matches played with different players PV Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.