सीओईपी संघाची विजेतेपदाची हॅटट्रिक
By admin | Published: February 20, 2017 12:43 AM2017-02-20T00:43:31+5:302017-02-20T00:43:31+5:30
तीव्र चढ आणि उतार, पाण्याची तळे, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज आॅफ इंजिनियरिंग पुणेच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले.
आकाश नेवे / पिथमपूर (इंदूर)
तीव्र चढ आणि उतार, पाण्याची तळे, खडकाळ ट्रॅक यातून मार्ग काढत कॉलेज आॅफ इंजिनियरिंग पुणेच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम निकालात पुण्याच्या नवले अभियांत्रिकी, सिंहगड अभियांत्रिकी, आल्हाट महाविद्यालय आणि सीओईपीचाच बोलबाला राहिला. जवळपास प्रत्येक विभागात पुण्याच्या महाविद्यालयांनी विजय मिळवला.
एम बाहा तील अंतिम निकालात सर्वोत्तम संघाचे पारितोषिक सीओईपी पुणे, द्वितीय पारितोषिक आल्हाट अभियांत्रिकी पुणे, तिसरे स्थान जालंधरच्या बी. आर. आंबेडकर नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने पटकावले.
तर इ बाहात पहिले स्थान पुण्याच्या सिंहगड अभियांत्रिकीने, तर दुसरे स्थान बी. व्ही. कॉलेज आॅफ इन्स्टिट्यूटने पटकावले. या स्पर्धेत एम बाहा या गटात अनेक संघ स्पर्धाच पूर्ण करू शकले नाहीत.
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एसएई इंडियाने आयोजित केलेल्या बाहा २०१७ या एटीव्ही रेसचा समारोप पिथमपूर येथील नॅटरॅक्स येथे करण्यात आला.
सकाळी स्पर्धेचे उद्घाटन महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे एम. डी. पवन गोयंका यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेची सुरुवात १५ रोजी करण्यात आली होती. तांत्रिक चाचण्यांनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी एड्युरंस टेस्ट घेण्यात आली. या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयाच्या संघाला सलग चार तास आपली एटीव्ही चालवयाची होती.
खडकाळ रस्ता, चिखल, पाणी, तीव्र चढ-उतार याचा सामना करत या संघांनी आपल्या गाड्या मजबूत असल्याची चाचणी दिली. त्यातून तांत्रिक बाबींतून सीओईपीच्या संघाला विजेता घोषित करण्यात आले.