कर्णधारांचा योगायोग
By admin | Published: March 23, 2015 01:46 AM2015-03-23T01:46:39+5:302015-03-23T01:46:39+5:30
उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी (भारत), मायकल क्लार्क (आॅस्ट्रेलिया), ब्रेन्डन मॅक्युलम (न्यूझीलंड) आणि एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) यांच्यामध्ये बरीच समानता आहे.
सिडनी/आॅकलंड : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी (भारत), मायकल क्लार्क (आॅस्ट्रेलिया), ब्रेन्डन मॅक्युलम (न्यूझीलंड) आणि एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) यांच्यामध्ये बरीच समानता आहे.
वन-डे पदार्पण
या चारही खेळाडूंनी एक-एक वर्षांच्या फरकाने वन-डे कारकीर्दीचा प्रारंभ केला. ब्रेन्डनने २००२, क्लार्कने २००३, धोनीने २००४ अणि डिव्हिलियर्सने २००५ मध्ये वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
जन्मदिवस
चारही कर्णधारांमध्ये धोनी, ब्रेन्डन व क्लार्क ३३ वर्षांचे आहेत. क्लार्कचा जन्म २ एप्रिल १९८१, धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ आणि ब्रेन्डनचा जन्म २७ सप्टेंबर १९८१ ला झालेला आहे. डिव्हिलियर्स ३१ वर्षांचा असून त्याचा जन्म १७ फेब्रुवारी १९८४ ला झाला आहे.
यष्टिरक्षक फलंदाज
या चारही कर्णधारांमध्ये धोनी, ब्रेन्डन आणि डिव्हिलियर्स मूळ यष्टिरक्षक फलंदाज आहे, पण या विश्वकप स्पर्धेत ब्रेन्डन व डिव्हिलियर्स केवळ फलंदाज म्हणून सहभागी झाले आहेत. न्यूझीलंड संघात ल्युक रोंची व दक्षिण आफ्रिका संघात क्विंटन डिकॉक यष्टिरक्षकाची भूमिका बजावित आहेत. या चारही कर्णधारांमध्ये केवळ धोनी यष्टिरक्षकाची भूमिका बजावत आहे. त्याने यष्टिपाठी सर्वाधिक १५ बळी घेतले आहेत.
धावा
वन-डे कारकीर्दीचा विचार करता धोनी, क्लार्क आणि डिव्हिलियर्स यांच्या धावा फटकावण्याच्या बाबतीत विशेष फरक नाही. धोनीने २६१ सामन्यांत ८४३४ धावा, क्लार्कने २४३ सामन्यांत ७८९७ धावा आणि डिव्हिलियर्सने १८६ सामन्यांत ७८७६ धावा फटकावल्या आहेत. ब्रेन्डनने २४७ सामन्यांत ५७४९ धावा फटकावल्या आहेत.