कोलमन भावंडांनी मुंबई जिंकली
By admin | Published: March 5, 2017 11:59 PM2017-03-05T23:59:02+5:302017-03-05T23:59:02+5:30
बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भाऊ - बहिण जोडीने पहिल्या वहिल्या पी१ मुंबई ग्रां. प्री. पॉवरबोट स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्का मारला.
मुंबई : पहिल्या दोन शर्यतींवर राखलेले वर्चस्व अंतिम फेरीतही कायम राखून बूस्टर जेट्सच्या सॅम आणि डेसी या कोलमन भाऊ - बहिण जोडीने पहिल्या वहिल्या पी१ मुंबई ग्रां. प्री. पॉवरबोट स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्का मारला. सॅम - डेसीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावरच बूस्टर जेट्स संघाने स्पर्धेत सर्वांगिण विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे सीएस संतोष या भारतीय ड्रायव्हरचा समावेश विजयी संघात असल्याने या स्पर्धेच्या पहिल्याच भारतीय मोसमात तिरंगाही फडकला.
शनिवारी दोन शर्यतींमध्ये कोलमन भावंडांनी एकहाती वर्चस्व राखताना संघाला मोठी गुणसंख्या मिळवून दिली. संतोष आणि त्याचा नेव्हीगेटर साथीदार यांनी पहिल्या दोन शर्यतींमधून १९ गुणांची समाधानकारक कामगिरी केली. त्याचवेळी लॉयड डॉल्फिन संघाने कडवी टक्कर देताना बूस्टर जेट्सला जवळपास गाठलेच होते. स्पर्धेच्या अंतिम दिवशीही या दोन संघांमध्येच रोमांचक चुरस रंगली होती. मात्र, कोलमन भावंडांनी निर्णायक भूमिका बजावताना अंतिम दिवशीही अव्वल स्थान राखताना संघाचे विजेतेपद सहजपणे निश्चित केले.
बूस्टर जेट्सने सर्वाधिक ६० गुणांसह सांघिक विजेतेपदावर नाव कोरले. लॉयड डॉल्फिन संघाने ४७ गुणांसह उपविजेतेपद पटकावले, तर मनी आॅन मोबाईल मर्लिन्स संघाला ४६ गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील अन्य भारतीय ड्रायव्हर असलेल्या गौरव गिलची कामगिरीही समाधानकारक राहिला. गौरवचा अल्ट्रा शार्क संघ ६४ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. तर, वैयक्तिक क्रमवारीत गौरवला ३४ गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)
>पी१ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्री. शर्यतीचे सांघिक विजेतेपद स्वीकारताना विजयी बूस्टर जेट्सचे खेळाडू. (डावीकडून) सी. एस. संतोष, मार्टिन रॉबिन्सन, सॅम कोलमन आणि डेसी कोलमन.
>सांघिक क्रमवारी
१. बूस्टर जेट्स- ८९ गुण
२. लॉयड डॉल्फिन्स- ८७ गुण
३. मनी आॅन मोबाईल मर्लिन्स- ७९ गुण
४. अल्ट्रा शाकर््स- ६४ गुण
५. मिर्ची मेवरिक्स- ४५ गुण
६. एचव्हीआर रेसिंग- ३८ गुण