कोलंबिया ‘शूटआऊट’
By admin | Published: June 28, 2015 01:50 AM2015-06-28T01:50:41+5:302015-06-28T01:50:41+5:30
कोपा अमेरिका स्पर्धेत चार वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारत अर्जेंटिनाच्या कार्लोस टेवेझने कोलंबियाविरुद्ध निर्णायक पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित
कोपा फुटबॉल : अर्जेंटिना सेमी फायनलमध्ये
डेलमार (चिली) : कोपा अमेरिका स्पर्धेत चार वर्षांपूर्वी केलेली चूक सुधारत अर्जेंटिनाच्या कार्लोस टेवेझने कोलंबियाविरुद्ध निर्णायक पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित करीत संघाला शूटआऊटमध्ये ५-४ ने विजयी केले अन् सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. सेमी फायनलमध्ये आता अर्जेंटिनाची लढत ब्राझील आणि पॅराग्वे यांच्यातील विजयी संघाबरोबर होईल.
रोमहर्षकतेचा कळस गाठलेल्या अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यातील या महत्त्वपूर्ण सामन्यात सर्वांची नजर टेवेझ याच्या निर्णायक पेनल्टीवर होती. याला कारण म्हणजे चार वर्षांपूर्वी टेवेझ शूटआऊटमध्ये पेनल्टीला गोलमध्ये बदलू शकला नव्हता. या ऐतिहासिक चुकीमुळे अर्जेंटिना कोपा अमेरिका स्पर्धेतून बाहेर पडला होता; परंतु तो कलंक पुसण्यात आज टेवेझ यशस्वी ठरला. कोलंबियाचा गोलरक्षक ओस्पिना याला चकवून त्याने गोल नोंदविला आणि अर्जेंटिना सेमी फायनलमध्ये दाखल झाला. अर्जेंटिना व कोलंबिया यांच्यातील अटीतटीचा सामना निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला. अर्जेंटिनाकडून लिओनेल मेस्सी, एजेकुएल गॅरे, एवेर बानेगा, जिकुवेल लॅवरेजी आणि कार्लोस टेवेझ यांनी पेनल्टीवर गोल केले.
ओस्पिना ‘सामनावीर’
टेवेझचा निर्णायक पेनल्टी रोखण्यात अपयशी ठरला असला तरी कोलंबियाचा गोलरक्षक ओस्पिना याने सामन्यात उत्कृष्ट गोलरक्षण केले. त्यामुळेच त्याला ‘सामनावीर’चा पुरस्कार देण्यात आला. ओस्पिनाने २५ व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या सलग दोन आक्रमणांना थोपविले. सामना संपण्यास दहा मिनिटे राहिली असताना निकोलस ओटामेंडीचा हल्लाही परतवून लावला. त्याच्या या कामगिरीमुळे सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला.
हा विजय माझ्या संघसहकाऱ्यांसाठी आहे. मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. आम्ही अजून येथे आहोत, याचा अर्थ आम्ही आपले काम चोखपणे करीत आहोत.- कार्लोस टेवेझ