कोलंबियाची ब्राझीलला ‘किक’
By admin | Published: June 19, 2015 02:21 AM2015-06-19T02:21:29+5:302015-06-19T02:21:29+5:30
कोलंबिया संघाने धक्कादायक निकालाची नोंद करताना सर्वाधिक पाच वेळचे विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझील संघाला धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत
सँटियागो : कोलंबिया संघाने धक्कादायक निकालाची नोंद करताना सर्वाधिक पाच वेळचे विश्वविजेत्या बलाढ्य ब्राझील संघाला धक्का देत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत खळबळ माजवली. कोलंबियाने ब्राझीलला १-० असा धक्का दिला. विशेष म्हणजे ब्राझीलचा स्टार व हुकमी खेळाडू नेयमार याला धसमुसळ्या खेळामुळे पंचांनी थेट लाल कार्ड दाखवले. तसेच कोलंबियाचा स्ट्राईकर कार्लोस बाका यालादेखील रेड कार्ड दाखविण्यात आले.
‘क’ गटात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. परंतु, कोलंबियाने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना निर्णायक गोलाच्या जोरावर बाजी मारली. जैसन मुरीलो याने ३६व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करताना कोलंबियाला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला आघाडी कायम राखल्यानंतर कोलंबियाने अखेरपर्यंत भक्कम बचाव करताना ब्राझीलचे आक्रमण रोखले आणि एकमेव गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवताना सनसनाटी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बाचाबाचीदेखील झाली. यामुळे काही वेळ वातावरण तंग झाले होते. या वेळी ब्राझीलियन स्टार नेयमारला रेड कार्डला सामोरे जावे लागले. तर, कोलंबियाचा स्ट्रायकर कार्लोसलाही रेड कार्ड दाखविण्यात आले. (वृत्तसंस्था)