मुंबईत रंगणार चौरंगी गोल्फ स्पर्धेची रंगत
By admin | Published: February 3, 2017 04:42 AM2017-02-03T04:42:32+5:302017-02-03T04:42:32+5:30
चेंबुर येथील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब येथे ४ व ५ फेब्रुवारी दरम्यान चौरंगी आंतर क्लब गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेची रंगत रंगणार आहे. दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत युनायटेड
मुंबई : चेंबुर येथील बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब येथे ४ व ५ फेब्रुवारी दरम्यान चौरंगी आंतर क्लब गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेची रंगत रंगणार आहे. दोन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत युनायटेड सर्विसेस क्लब (यूएससी), यजमान बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लब (बीपीजीसी), विलिंग्टन स्पोटर््स क्लब (डब्ल्यूएससी) आणि पूना क्लब गोल्फ हे संघ विजेतेपदासाठी भिडतील.
हौशी गोल्फर्ससाठी असलेल्या या स्पर्धेत यंद अनेक युवा खेळाडूंचे कौशल पाहण्यास मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदा १८ वर्षांखालील खेळाडू आपल्याहून सरस असलेल्या खेळाडूंना कडवी टक्कर देण्यास सज्ज झाले असल्याने स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. यूएस क्लब या स्पर्धेत गतविजेते असून त्यांनी सलग दोन वर्ष या स्पर्धेचे जेतेपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. तसेच, यंदा त्यांनी विजेतेपदाची हॅट्ट्रीक साधण्याचा निर्धार करतानाच प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिला आहे.
त्याचवेळी, यजमान बीपीजीसी संघाला घरच्या मैदानाचा फायदा होणार असल्याने गतविजेत्यांपुढे बीपीजीसीचे तगडे आव्हान असेल. स्पर्धेत एकूण ७ वेळा बाजी मारलेल्या मुंबईच्या बीपीजीसीने आपल्या आठव्या विजेतेपदावर लक्ष केंद्रीत करताना यूएस संघाला हॅट्ट्रीकपासून रोखण्यात कोणतीही कसर ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले.
चारही संघांनी निवड चाचणीद्वारे आपला सर्वोत्तम संघ स्पर्धेत उतरवला आहे. पुढील सत्रामध्ये भारताच्या स्टार खेळाडूंनाही खेळविण्यात येण्याची शक्यता आसल्याचे, आयोजकांनी यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)