आजपासून रंगणार रंगीत तालीम

By Admin | Published: February 17, 2017 12:34 AM2017-02-17T00:34:15+5:302017-02-17T00:34:15+5:30

शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्यासह भारत ‘अ’ संघातील प्रमुख खेळाडू

Colorful training from today | आजपासून रंगणार रंगीत तालीम

आजपासून रंगणार रंगीत तालीम

googlenewsNext

मुंबई : शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या तीनदिवसीय सराव सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्यासह भारत ‘अ’ संघातील प्रमुख खेळाडू भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याच्या निर्धाराने खेळतील. गेल्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केलेला हार्दिक या सराव सामन्यातही चमकदार कामगिरीसह कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करेल.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या या सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलियाच्या जोश हेजलवुड आणि मिशेल स्टार्कसारख्या तगड्या गोलंदाजांसह स्वत:ची क्षमता जाणून घेण्याची संधी हार्दिकला मिळेल. त्याचप्रमाणे सलामीवीर प्रियांक पांचाळने रणजी सत्र गाजवल्यानंतर बांगलादेशविरुध्दच्या सराव सामन्यात शतक ठोकले होते. मात्र, आॅस्टे्रलियाच्या भेदक माऱ्यापुढे त्याचा खरा कस लागेल. तसेच, १९ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी फलंदाज रिषभ पंत आणि इशान किशन यांच्यावरही भारत ‘अ’च्या फलंदाजीची मदार असेल. दोघेही उत्कृष्ट यष्टीरक्षक असून यंदाच्या रणजी व सध्या सुरु असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत दोन्ही फलंदाजांनी आपली चमक दाखवली आहे.
श्रेयश अय्यर आणि अखिल हेरवाडकर या मुंबईकरांवरही विशेष लक्ष असेल. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या पांचाळसह हेरवाडकर डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा आहे. मधल्या फळीत महाराष्ट्राच्या अंकित बावणे आणि तमिळनाडूच्या बाबा इंद्रजितवर मदार असेल. खेळपट्टीवर फिरकीपटूंना चांगली उसळ मिळण्याची अपेक्षा आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवसह झारखंडचा शाहबाज नदीम कांगारुंना नाचवण्याची क्षमता राखून आहेत. तसेच, हैदराबादचा मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार असून त्याच्यासह दिंडा व हार्दिक आॅसीला रोखण्याचा प्रयत्न करतील. (क्रीडा प्रतिनिधी)
निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्याची संधी : हार्दिक
च्कसोटी क्रिकेटची दारे ठोठावित असलेला वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्या संधीच्या शोधात आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी आज शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या सराव सामन्यात भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले. या सामन्याद्वारे निवडकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दमदार कामगिरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना हार्दिक म्हणाला, ‘अ संघात खेळणाऱ्या सर्वच युवा खेळाडूंसाठी ही चांगली
संधी असेल. मला कसोटी संघात स्थान मिळवायचे असल्याने निवडकर्त्यांना प्रभावित करण्याचे लक्ष्य राहील.’
वन-डेचा तज्ज्ञ खेळाडू असलेल्या हार्दिकने वेगवान माऱ्यात सुधारणा केली. सराव सामन्यात प्रभावी ठरल्यास कर्णधार कोहली आणि कोच कुंबळे पुढच्या सामन्यांसाठी त्याचा विचार करू शकतात. तो म्हणाला, ‘मी आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध खेळलो होतो. माझ्यासाठी तो चांगला अनुभव ठरला. आॅस्ट्रेलियाचे खेळाडू आक्रमक असल्याने चांगली स्पर्धा अनुभवायला मिळते.’
इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्ध कसोटीसाठी संधी मिळूनदेखील हार्दिकला अंतिम एकादशमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तथापि कर्णधार आणि कोच यांनी अष्टपैलू या नात्याने गुजरातच्या या खेळाडूचे कौतुक केल्याने हार्दिकचे मनोबल उंचावले.
७ वन-डे आणि १९ टी-२० सामने खेळलेला हार्दिक पुढे म्हणतो, ‘कोच आणि कर्णधारांनी कौतुक केल्यामुळे बळ मिळाले. राष्ट्रीय संघात खेळायचे झाल्यास क्रिकेटचा प्रकार बदलल्यास ताळमेळ बसविणे शिकायला हवे, असे मला कळले आहे.
हे कठीण काम असले तरी याचा थेट संबंध मानसिकतेशी आहे. सध्या जे महान खेळाडू तिन्ही प्रकारात खेळताना दिसतात हे अनेक वर्षांपासून ताळमेळ बसविताना दिसतात. संघासाठी हे तंत्र शिकायलाच हवे.’ (वृत्तसंस्था)
सराव सामन्यासाठी संघ :

भारत ‘अ’ : हार्दिक पंड्या (कर्णधार), अखिल हेरवाडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयश अय्यर, अंकित बावणे, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाज नदीम, कृष्णप्पा गोथम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक दिंडा, मोहम्मद सिराज, राहुल सिंग आणि बाबा इंद्रजित.
आॅस्टे्रलिया : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हीड वॉर्नर, अशोक एगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीफन ओकीफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन आणि मॅथ्यू वेड.

Web Title: Colorful training from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.