टीकाकार नेहमी तलवार घेऊन बसलेले असतात - धोनी
By admin | Published: October 15, 2015 12:01 PM2015-10-15T12:01:23+5:302015-10-15T12:01:46+5:30
टीकाकार नेहमीच हातात तलवार घेऊन बसलेले असतात असा टोला महेंद्रसिंह धोनीने लगावला आहे.
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. १५ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ९२ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून देणा-या कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीकाकारांवर बरसला आहे. टीकाकार नेहमीच हातात तलवार घेऊन बसलेले असतात असे धोनीने म्हटले आहे.
पराभव आणि खराब फॉर्म यामुळे कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर गेल्या काही दिवसांपासून टीका सुरु होती. अजित आगरकरने धोनीला संघात स्थान देण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात धोनीने महत्त्वाच्या क्षणी नाबाद ९२ धावांची खेळी केली व भारताला विजय मिळवून दिला. धोनीने मैदानात बॅटने त्याच्या टीकाकारांना उत्तर दिले असून सामन्यानंतर प्रतिक्रिया देतानाही धोनीने टीकाकारांवर निशाणा साधला. मी कधी चुका करीन आणि ते यातून मजा घेतील या प्रतिक्षेत बरीच लोक तलवार घेऊन बसलेले असतात असा टोलाच त्याने लगावला आहे.
गेल्या दोन वर्षात आमचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करत होते, त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर फारसा दबाव येत नव्हता. कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यावर वन डेत मला चौथ्या स्थानावर फलंदाजीला यायचे होते, पण संघाची गरज आणि नवीन खेळाडूंना जास्त संधी मिळावी यासाठी मी पाचव्या स्थानावर फलंदाजीला येतो असे धोनीने सांगितले. दुस-या सामन्यात आम्हाला विजय मिळाला असला तरी आमच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे अशी कबुलीही त्याने दिली.