राष्ट्रकुल मुष्टियुद्ध स्पर्धा : भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दाखल; मनोज कुमार, मेरी कोमकडे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:54 AM2018-03-18T01:54:21+5:302018-03-18T01:54:21+5:30
येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल्डकोस्टसाठी रविवारी (दि. १८) रवाना होईल.
नवी दिल्ली : येत्या ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय बॉक्सर्सची आज निवड जाहीर करण्यात आली. मनोज कुमार (६९ किग्रॅ) आणि पाच वेळची चॅम्पियन एम. सी. मेरी कोम (४८ किग्रॅ) यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यांचा पुरुष व महिला संघ गोल्डकोस्टसाठी रविवारी (दि. १८) रवाना होईल.
तेथील परिस्थितीशी समरस होण्यासाठी खेळाडूंना अडचणी येऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भारतीय खेळाडूंना आज निरोप देण्यात आला. या वेळी भारतीय बॉक्सिंगचे अध्यक्ष अजय सिंह, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक नीलम कपूर आणि भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पाच पदके (एक सुवर्ण, ४ रौप्य) पटकाविली होती. २०१० मध्ये दिल्लीत ३ सुवर्ण आणि चार कांस्य पदकांसह एकूण ७ पदके मिळवली होती. संघाचा अनुभवी खेळाडू मनोज याने २०१० मध्ये सुवर्णपदक पटकाविले होते. मात्र, गेल्या वेळी तो उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला होता. तो म्हणाला, हा आमचा आतापर्यंतचा सर्वात मजबूत संघ आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहोत. आम्हाला चांगल्या सुविधा मिळत आहेत. आता चांगले प्रदर्शन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
संघ असा
महिला : एम. सी. मेरी कोम (४९ किग्रॅ), पिंकी राणी (५१ किग्रॅ), एल. सरिता देवी (६० किग्रॅ), लोवलिना बोरोघेन (६९ किग्रॅ). प्रशिक्षक : शिव सिंह, विदेशी प्रशिक्षक : राफाएल बारगामास्को. पुरुष : अमित पांघल (४९ किग्रॅ), गौरव सोळंकी (५२ किग्रॅ), मोहम्मद हसमुद्दीन (५६ किग्रॅ), मनीष कौशिक (६० किग्रॅ), मनोज कुमार (६९ किग्रॅ), विकास कृष्ण (७५ किग्रॅ), नमन तंवर (९१ किग्रॅ) आणि सतीश कुमार (९१ किलोपेक्षा अधिक), प्रशिक्षक : एस. आर. सिंह, विदेशी प्रशिक्षक : सैंटियागो निएवा.