Commonwealth Games 2018 : दिपक लाथरची कांस्यपदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 01:35 PM2018-04-06T13:35:10+5:302018-04-06T13:35:10+5:30
दीपकने स्नॅच प्रकारात 136 आणि क्लीन व जर्क प्रकारात 159 असे एकूण 295 किलो वजन उचलत भारताला पदक मिळवून दिले.
गोल्ड कोस्ट: भारताचा वेटलिफ्टर दीपक लाथरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कांस्यपदकाची कमाई केली आहे. कॅरारा अरेना येथे झालेल्या पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात दीपकने तिसरा क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकावले. दीपकने स्नॅच प्रकारात 136 आणि क्लीन व जर्क प्रकारात 159 असे एकूण 295 किलो वजन उचलत भारताला पदक मिळवून दिले. या स्पर्धेतील भारताचे हे चौथे पदक आहे. यापूर्वी भारताने दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले आहे. पुरुषांच्या 62 किलो वजनी गटामध्ये वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने सुवर्ण आणि श्रीलंकेच्या सी. डीसानायकेने रौप्यपदक मिळवले.
हरयाणाचा 18 वर्षीय दीपक पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळण्यासाठी उतरला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी दीपकने 62 किलो वजनी गटामध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.
शुक्रवारी पहाटे भारताच्या संजिता चानूने महिलांच्या 53 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. संजिताने स्नॅच आणि क्लीन व जर्क प्रकारात 192 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. गुरुवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूनेही सुवर्णपदक पटकावले होते.