Commonwealth Games 2018: अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालाचा 'सुवर्ण'वेध; भारताच्या खात्यात १६वं 'गोल्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 10:02 AM2018-04-13T10:02:13+5:302018-04-13T10:52:00+5:30
२५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात अनिशची सोनेरी कामगिरी
गोल्डकोस्ट: अवघ्या १५ वर्षांच्या अनिश भानवालानं राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अनिशनं २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सोनेरी कामगिरी करत भारताला स्पर्धेतलं सोळावं सुवर्णपदक मिळवून दिलं. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणाऱ्या अनिशनं सुवर्णपदकाचा अचूक वेध घेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक पटकावण्याचा विक्रम अनिशच्या नावावर जमा झाला आहे. बेलमॉन्ट शूटिंग रेंजवर रंगलेल्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धा प्रकारात अचूक निशाणा साधत अनिशनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. अतिशय अनुभवी खेळाडूंशी स्पर्धा असतानाही अनिशनं कोणतंही दडपण न घेता जबरदस्त कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा सर्गेई इवग्लेवस्की आणि इंग्लंडचा सॅम गोविन यांना मागे टाकत अनिशनं सुवर्णपदकाची कमाई केली.
पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णवेध घेत अनेक विक्रम मोडीत काढले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३० गुणांची कमाई करत अनिशनं नव्या विक्रमाची नोंद केली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या इवग्लेवस्कीनं २८ गुणांसह रौप्यपदक जिंकलं, तर इंग्लंडच्या सॅम गोविननं १७ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. काही दिवसांपूर्वीच भारताची नेमबाज मनू भाकरनं १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम मनूनं केला होता. मात्र अनिशनं मनूचा विक्रम मोडीत काढत नव्या विक्रमाची नोंद केली.