खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने सोडले मॉडेलिंग ; भारताला मिळवून दिले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 09:56 AM2018-04-09T09:56:11+5:302018-04-09T09:58:25+5:30
सिंगापूरचा संघ विजेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र, भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला.
गोल्ड कोस्ट: सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करताना दिसत आहेत. भारताला आतापर्यंत वेटलिफ्टिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नेमबाजी या प्रकारांमध्ये पदके मिळाली आहेत. महिला टेबल टेनिसमध्ये रविवारी भारतीय संघाने सिंगापुरला हरवून सुवर्णपदक मिळवले. सिंगापूरचा संघ विजेतेपदासाठी फेव्हरिट मानला जात होता. मात्र, भारतीय महिलांनी जबरदस्त कामगिरी करत सिंगापूरला जोरदार धक्का दिला. यामध्ये 22 वर्षांच्या मनिका बात्राने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. मनिकाने पहिली लढत जिंकून भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या निर्णायक लढतीमध्येही मनिकाने भारताला विजय मिळवून दिला.
यासाठी सध्या मनिकाचे कौतुक होत असले तरी बॅडमिंटनसाठी तिला आपल्या बऱ्याच आवडीनिवडींना मुरड घालावी लागली. बॅडमिंटनवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी तिला कॉलेज आणि मॉडेलिंग सोडावे लागले होते. तिने मध्यंतरी दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. बँडमिंटनच्या सरावामुळे तिला महिन्यातून एकदाच कॉलेजला जायला मिळायचे. त्यामुळे तिने
अखेर दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. साहजिकच तिला महाविद्यालयांच्या कार्यक्रमांना आणि फ्रेशर्स पार्टीजनाही मुकावे लागले. मनिकाला मॉडेलिंगचीही आवड होती. चांगल्या उंचीमुळे तिने महाविद्यालयात असताना काही कार्यक्रमांमध्ये मॉडेलिंग केले होते. परंतु, टेबलटेनिसच्या सरावासाठी तिला या आवडीवरही पाणी सोडावे लागले. परंतु, काल तिने भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात बजावलेली महत्त्वाची भूमिका पाहता तिच्या मेहनतीचे चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही.
सिंगापूरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मनिका बत्राने संघर्षपूर्ण विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या तिनवेई फेंगला 11-8, 8-11, 7-11, 11-9 आणि 11-7 असा पराभवाचा धक्का देत मनिकाने भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्या सामन्यात सिंगापूरच्या मेनग्यू यूने भारताच्या मधुरिका पाटकरचा 13-11, 11-2, 11-6 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. त्यामुळे अंतिम फेरीत 1-1 अशी बरोबरी निर्माण झाली.
यानंतर दुहेरीत मौमा दास आणि मधुरिका पाटकर यांनी यिहान झोऊ आणि मेनग्यू यू यांचा 11-7, 11-6, 8-11 आणि 11-7 असा पराभव करत भारताला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. यानंतर मनिका बत्राने तिच्या दुसऱ्या सामन्यात यिहान झोऊचा 11-7, 11-4 आणि 11-7 असा पराभव करत संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.