Commonwealth Games 2018: मेरी कोमचा 'सुवर्ण' ठोसा, भारताच्या खात्यात 18वं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 07:55 AM2018-04-14T07:55:40+5:302018-04-14T08:06:03+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
गोल्ड कोस्ट- राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंग प्रकारात मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 45-48 किलो वजनीगटात 35 वर्षीय मेरी कोमने पदकाला गवसणी घातली आहे. अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर 5-0ने मात करत मेरी कोमने सुवर्णपदक आपल्या नावे केलं. विशेष म्हणजे राष्ट्रकुलमधलं मेरी कोमचं हे पहिलं पदक आहे. मेरी कोमकडे आत्तापर्यंत एकदाही राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक नव्हतं. मेरी कोमच्या या गोल्डन पंचनंतर भारताच्या खात्यात एकुण 18 सुवर्णपदकं जमा झाली आहेत.
पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या मेरी कोमकडे राष्ट्रकुल स्पर्धेचं एकही पदक नव्हतं. पण आज मेरी कोमने सुवर्णपदक तिच्या नावे केलं आहे. मेरी कोम व क्रिस्टिना ओहारा या दोघींमध्ये अंतिम व निर्णायक सामन्यात एकुण पाच फेऱ्या खेळल्या गेल्या. ज्यामध्ये मेरी कोमने प्रत्येक फेरीत वर्चस्व कायम राखलं आणि देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं.
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकुण 43 पदकं जिंकली आहेत. त्यामुळे 18 सुवर्णपदकं, 11 रौप्यपदकं व 14 कास्यपदकांचा समावेश आहे.