Commonwealth Games 2018 : राष्ट्रकुलचे दिमाखदार उद्घाटन, भारताच्या मोहिमेला आजपासून होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:23 AM2018-04-05T02:23:39+5:302018-04-05T02:23:39+5:30
दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली.
गोल्ड कोस्ट - दिमाखदार उद्घाटन सोहळा झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संचलन कार्यक्रमामध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने केले. सिंधूने नेतृत्व करताना फडकावलेला तिरंगा आणि तिच्या पाठोपाठ येत असलेला भारतीय संघ पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. भारतीय पथकात दोनवेळा आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सुशील कुमार, लंडन आॅलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मेरी कोम, सायना नेहवाल आणि गगन नारंग या दिग्गजांचा समावेश होता. भारतीय खेळाडूंचे तिरंग्यासह आगमन होताच २५ हजार प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. दरम्यान पहिल्यांदाच भारतीय महिला खेळाडूंनी पारंपरिक वेषभूषा असलेली साडी नेसली नव्हती. यंदा भारताचे सर्व खेळाडू ब्लेझर्स आणि पँट घालून होते. (वृत्तसंस्था)
राष्ट्रकुलचे पाचव्यांदा आयोजन...
आॅस्ट्रेलिया पाचव्यांदा राष्ट्रकुलचे यजमानपद भूषवित आहे. गोल्ड कोस्ट व्हिलेजमध्ये खेळाडूंची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा नसताना मोकळ्या वेळात खेळाडूंना मन रमवता यावे यासाठी व्हर्च्युअल कॉम्प्युटर गेम्स, जलतरण तलाव, कृत्रिम धबधबे, पियानोची व्यवस्था करण्यात आली आहे.
रिंगणात न उतरताच ‘ती’ बनली पदक विजेती
आॅस्ट्रेलियाची महिला बॉक्सर टेलाह रॉबर्टसन २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेची पहिली पदक विजेती ठरली. तिने रिंगणात न उतरताच हे पदक जिंकले. ५१ किलो वजन गटात पुढे चाल मिळताच रॉबर्टसनने थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
१९ वर्षांच्या रॉबर्टसनच्या गटात अधिक खेळाडू नसल्यामुळे तिचे पदक पक्के झाले. भारतीय खेळाडूंना मात्र या संधीपासून वंचित व्हावे लागले. एम. सी. मेरिकोमला पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली असली तरी ८ एप्रिल रोजी क्वार्टर फायनल खेळावी लागेल.
प्रथमच स्पर्धेत उतरणारी रॉबर्टसन म्हणाली,‘मी केवळ कांस्यवर समाधान मानणार नाही. मला तर सुवर्ण जिंकायचे आहे.’ भारताने ५१ किलो गटात एकाही महिला खेळाडूला संधी दिलेली नाही. भारताकडून गुरुवारी ९१ किलो वजन गटात २०१० च्या राष्टÑकुलचा सुवर्ण विजेता मनोज कुमार रिंगणात उतरणार आहे.
मूळनिवासींचा विरोध...
स्टेडियममधील झगमगाटातही मूळनिवासींचा विरोध प्रकर्षाने दिसून आला. या नागरिकांनी घोषणाबाजी करीत जवळपास तासभर क्वीन्स बॅटन रिले रोखून धरली. ब्रिटिश राजवटीतील क्रूरतेला हा विरोध होता. आॅस्ट्रेलियाने राष्टÑकुलसोबतचे नाते संपुष्टात आणावे, अशी मूळनिवासींची मागणी आहे. येथील मूळनिवासींवर ब्रिटिश राजवटीत अमानुष अत्याचार करण्यात आले होते.
पथक प्रमुखावर विनयभंगाचा आरोप, मॉरिशसच्या महिला खेळाडूची तक्रार
राष्ट्रकुल सुरू होण्याआधीच एक वाद पुढे आला आहे. मॉरिशसच्या महिला खेळाडूूने आपल्याच पथक प्रमुखावर विनयभंगाचा आरोप केला. काल रात्री मिळालेल्या तक्रारीचा अधिकृत तपास सुरू असल्याचे आॅस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले.
मॉरिशसच्या मीडियानुसार पथक प्रमुख केसी तीरूवेंगादम यांच्यावर हा आरोप असून त्यांनी ताबडतोब पद सोडले. ते सध्या गोल्ड कोस्टमध्येच आहेत. राष्ट्रकुलसाठी आगमन झाल्यानंतर क्रीडाग्राममध्ये या अधिकाऱ्याने खेळाडूला चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचे हे प्रकरण आहे.