Commonwealth Games 2018: वेटलिफ्टर्सची 'भार'दस्त कामगिरी सुरूच; प्रदीप सिंहला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 08:07 AM2018-04-09T08:07:54+5:302018-04-09T09:08:56+5:30
भारताचे स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक
राष्ट्रकुल स्पर्धेतील भारतीय वेटलिफ्टर्सची शानदार कामगिरी सुरुच आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच प्रदीप सिंहने रौप्यपदकाची कमाई केली आहे. भारताचे हे या स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक आहे. प्रदीपने सुवर्णपदक विजेत्या समोआ सनेले माओला कडवी झुंज दिली. मात्र त्याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
यंदा वेटलिफ्टर्सनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. प्रदीप सिंहने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पाचव्या दिवसाला सुरुवात होताच १०५ किलो गटात रौप्यपदकाची कमाई केली. प्रदीप सिंहने अंतिम फेरीत समोआ सनेले माओला जबरदस्त झुंज दिली. २३ वर्षांच्या प्रदीप सिंहने अंतिम फेरीत २११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला अपयश आले. अन्यथा राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद झाली असती. प्रदीपला स्नॅचमध्ये सुरुवातीला १४८ किलोंचे वजन उचलण्यात अपयश आले. मात्र त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी ठरला. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने १५२ किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले.
यानंतर क्लिन अँड जर्कमध्ये प्रदीपने २०० किलो वजन उचलत सुरेख सुरुवात केली. याआधी प्रदीपने क्लिन अँड जर्कमध्ये १९६ किलो वजन उचलले होते. मात्र प्रदीपने या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी उंचावली. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने २०९ किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने २११ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये तो अपयशी ठरला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.