Commonwealth Games 2022 : गतविजेत्या टेबल टेनिस संघाचा पराक्रम, नायजेरियाला नमवून पक्कं केलं आणखी एक पदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 02:12 AM2022-08-02T02:12:32+5:302022-08-02T02:12:51+5:30
Commonwealth Games 2022 Table Tennis : पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही अटीतटीच्या लढतीत नायजेरियाचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला.
Commonwealth Games 2022 Table Tennis : बॅडमिंटन मिश्र सांघिक गटात भारताने अंतिम फेरीत प्रवेश करून किमान रौप्यपदक निश्चित केले. त्यापाठोपाठ पुरुषांच्या टेबल टेनिस संघानेही अटीतटीच्या लढतीत नायजेरियाचा पराभव करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१८च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यासह एक पदक निश्चित केले. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर सिंगापूरचे कडवे आव्हान असणार आहे. दरम्यान, सोमवारी भारताने आणखी तीन पदकांची कमाई करताना पदकसंख्या ९ अशी केली आहे. वेटलिफ्टिंग हरजिंदर कौरने कांस्य, ज्युदोत सुशीला देवीने रौप्य, तर विजय कुमारने कांस्यपदक पटकावले.
भारताचे नववे पदक! वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने जिंकून दिले आणखी एक कांस्यपदक
#Table Tennis दुहेरीच्या पहिल्या सामन्यात भारताच्या हरमीत देसाई व साथियन ज्ञानसेकरन यांनी विजयी सुरुवात करून दिली. या जोडीने नायजेरियाच्या बोडे एबिडन व ओलाजिदे ओमोयाटो यांचा ११-८, ११-७, ११-७ असा पराभव केलाय त्यानंतर भारताचा सर्वात अनुभवी टेबल टेनिसपटू शरथ कमलने पुरुष एकेरीत विजय मिळवला. २००६ पासून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेणारा कमल आतापर्यंत एकदाही पदकावीना घरी परतलेला नाही. त्याने पुरुष एकेरीच्या लढतीत कादरी अरुनाचा ११-९, ७-११, ११-८, १५-१३ असा चुरशीच्या लढतीत पराभव करताना भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. पुरुष एकेरीची दुसरी लढतही चुरशीची झाली आणि त्यातही ज्ञानसेकरनने बाजी मारताना ओमोयाटोवर ११-९, ४-११, ११-६, ११-८ असा विजय मिळवला. ३-० अशा विजयासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदासाठी त्यांच्यासमोर सिंगापूरचे आव्हान आहे.
#Badminton सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने भारताला मिश्र सांघिक गटाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिंगापूरविरुद्ध विजयी सुरुवात करून दिली. भारतीय जोडीने २१-११ व २१-१२ अशा फरकाने सिंगापूरच्या याँग काई टेरी ही व अँडी जून लिएंग यांच्यावर विजय मिळवत भारताल १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने निर्विवाद वर्चस्व गाजवले. तिने सिंगापूरच्या जिआ मिन येओवर २१-११, २१-१२ असा सोपा विजय मिळवताना भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. लक्ष्य सेनने पुरुष एकेरीच्या लढतीत लोह किनचे आव्हान २१-१८ व २१-१५ असे परतवून लावताना भारताला ३-० अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. २०१८चे सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने २०२२ मध्येही सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला.
- #Boxing भारताचा बॉक्सर अमित पांघल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने नामरी बेरीरवर ५-० असा विजय मिळवला. आता तो पदकापासून एक विजय दूर आहे.
- #Hockey भारतीय पुरुष हॉकी संघाने ४-१ अशी आघाडी असूनही इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४-४ अशा बरोबरीवर समाधान मानले. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंचा खेळ सुमार झाला