Commonwealth Games 2022 : अन्याय की नियम?, ८.०८ मीटरसह झाली होती टाय, तरीही मुरली श्रीशंकरला दिले रौप्य अन् बहामाच्या खेळाडूला सुवर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:24 AM2022-08-05T07:24:15+5:302022-08-05T07:25:02+5:30
Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली.
Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली. पाचव्या प्रयत्नात श्रीशंकरने ८.०८ मीटर लांब उडी मारून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. बहामासच्या लॅक्यून नैर्न यानेही दुसऱ्याच प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारली होती. त्यामुळे सहाव्या प्रयत्नात सुवर्ण झेप कोण घेतो याची उत्सुकता होती. भारताच्या श्रीशंकरचा प्रयत्न अयशस्वी ठरला, तर नैर्नने ७.९८ मीटर लांब उडी मारली. आता दोन्ही खेळाडू ८.०८ मीटरसह संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर होते, परंतु सुवर्णपदक हे बहामासच्या खेळाडूला दिले गेले. श्रीशंकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Murali Sreeshankar’s silver medal winning jump of 8.08m pic.twitter.com/mLao8rpNXi
— Rahul PAWAR (@rahuldpawar) August 4, 2022
जाणून घ्या कारण?
श्रीशंकरने पहिल्या तीन प्रयत्नांत ७.६० मी. ७.८४ मी. व ७.८४ मी. अशी लांब उडी मारली. भारताच्याच मुहम्मद अनीस याहिया ( Muhammed Anees Yahiya) याने सहाव्या प्रयत्नात ७.९७ मीटर लांब उडी मारून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह पाचवे स्थान पटकावले. श्रीशंकरला चौथ्या प्रयत्नात -१ सेंटीमीटरमुळे ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. तो निराश झाला, परंतु खचला नाही. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये रौप्यपदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला.
नियम काय सांगतो?
श्रीशंकर व नैर्न यांनी समसमान ८.०८ मीटर लांब उडी मारली. अशा परिस्थितीत खेळाडूंची दुसरी सर्वोत्तम उडी ग्राह्य धरून पदकाचा दावेदार ठरवला जातो. यावेळी नैर्नची दुसरी सर्वोत्तम उडी ही ७.९८ मीटर ही आहे आणि श्रीशंकरची ७.८४ मीटर... त्यामुळे श्रीशंकरला रौप्यपदक देण्यात आले.