Commonwealth Games 2022: भारतासाठी रौप्यपदक जिंकलं, PM मोदींसह दिग्गजांनी अभिनंदन केलं तरीही संकेतला एका गोष्टीची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 07:18 PM2022-07-30T19:18:59+5:302022-07-30T19:20:51+5:30
पदक विजेत्या संकेतला कसलं दु:ख.. वाचा सविस्तर
Commonwealth Games 2022 : सांगलीचा मराठमोळा वेटलिफ्टर, महाराष्ट्राचा सुपूत्र संकेत महादेव सरगर याने राष्ट्रकुल स्पर्धेत २०२२ भारताला पहिले पदक जिंकून दिले. संकेतने ५५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारतासाठी हे पहिलेच पदक ठरल्याने संकेतवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. संकेतने भारताची मान अभिमानाने उंचावल्यानंतर क्रीडा प्रेमींनी तर त्याला शुभेच्छा दिल्याच. पण त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत साऱ्यांनीच संकेतचं मनापासून अभिनंदन केले. तरीदेखील मराठमोळ्या संकेतला एका गोष्टीची खंत आहे, असं त्याने सांगितले.
संकेत सरगरने भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. पण तरीही त्याच्या मनात एका गोष्टीची खंत असल्याचे त्याने सांगितलं. संकेतने दमदार कामगिरी करत रौप्यपदक मिळवलं. अखेरच्या प्रयत्नापर्यंत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आघाडीवर होता, पण मोक्याच्या क्षणी त्याच्या हाताला दुखापत झाली अन् त्याचा कोपरा दुखावला. त्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळवता आलं नाही. त्याचा १३९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न फसला. १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक जिंकले अन् संकेतला रौप्यवर समाधान मानावे लागले. हीच त्याची खंत असल्याचे त्याने सांगितले. "मी आनंदी आहे पण मला दु:ख देखील होत आहे. कारण मी सुवर्ण पदक जिंकू शकलो नाही. गेली चार वर्षे मी सुवर्ण पदक जिंकण्यासाठी तयारी करत आहे. तरीदेखील कोपराच्या दुखापतीमुळे मला सुवर्णपदक मिळवता आलं नाही याची मला खंत आहे", असे त्याने सांगितले.
दरम्यान, श्रीलंकेच्या दिलंका इसुरू कुमार योदागेने स्नॅचमध्ये ( Snatch) पहिल्याच प्रयत्नात १०५ किलोचे लक्ष्य ठेवले होते आणि ते त्यांनी लिलया पेलले. पण, भारताचा संकेत आला अन् हवाच बदलून टाकली. त्याने पहिल्या प्रयत्नात १०७ किलो वजन उचलले. मलेशियाच्या बिन कॅस्डन मोहम्मद अनिकनेही १०७ किलो वजन उचलले. त्यामुळे संकेतसमोर १११ किलोचे लक्ष्य होते. स्नॅचमध्ये भारतासमोर श्रीलंका व मलेशियन खेळाडूंचे आव्हान होते. संकेतने १११ किलोचे वजनही सहज उचलले. या कामगिरीसह संकेतने राष्ट्रकुल व राष्ट्रीय विक्रमही मोडला. मलेशियन खेळाडू दुसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. स्नॅच प्रकारात ११३ किलो वजन उचलून संकेत अव्वल स्थानी राहिला. पण परिपूर्ण टॅलीमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.