Commonwealth Games 2022 : लॉन बॉलमध्ये भारताला आणखी एक पदक, महिलांपाठोपाठ पुरुष संघाने करून दाखवली कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 07:13 PM2022-08-06T19:13:15+5:302022-08-06T19:14:01+5:30
Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली, त्यात आज आणखी पदकाची भर पडली.
Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. शनिवारी अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळे व प्रियांका गोस्वामी यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर प्रियांकाने १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यक्रांती घडवली. विशेष म्हणजे या दोन्ही क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकण्याचा मान पटकावला.
Historic 🥈 for 🇮🇳's Men's Fours Team 🤩
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2022
Team India wins 🥈in the final of #LawnBowls Men's Team event - Sunil, Navneet, Chandan & Dinesh vs Northern Islands
Great Work Team👍
Let's #Cheer4India 🇮🇳#India4CWG2022pic.twitter.com/0GEcSKHbCM
#Lawn Bowls महिलांनी लॉन बॉल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग व दिनेश कुमार या भारतीय संघासमोर सुवर्णपदकासाठी नॉर्दन आयर्लंडचे आव्हान होते. चौथ्या फेरीपर्यंत भारतीय संघ ०-७ असा पिछाडीवर होता, परंतु पुढील दोन फेरींत दोन गुण घेत त्यांनी पिछाडी २-७ अशी कमी केली. सातव्या फेरीत आयर्लंडने ३ गुण घेताना आघाडी १०-२ अशी भक्कम केली. भारतीय खेळाडूंनी अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु त्यांना ५-१८ अशा पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
- #TableTennis अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने ८-११, ११-९, १०-१२, ११-१,११-८ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या लम निकोलस व लू फिन यांचा पराभव केला.
- #Badminton महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूला संघर्ष करावा लागला. मलेशियाच्या जिन वेई गोहने पहिला गेम २१-१९ असा जिंकल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने २१-१४ अशा विजयासह पुनरागमन केले. तिसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला, परंतु सिंधूने सातत्यपूर्ण खेळ करताना हा गेम २१-१८ असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
- #Athletics महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांनी ४४.४५ सेकंदासह हिटमध्ये दुसरे स्थान पटकावले.
- #Boxing भारताच्या नितू घंघासने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने कॅनडाच्या प्रियांका ढिल्लॉनवर सहज विजय मिळवला. अमित पांघलनेही ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत झाम्बियनच्या पॅट्रीक चिनयेम्बावर ५-० असा एकहाती विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
- #TableTennis अकुला श्रीजा व रिथ टेनिसन या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना वेल्सच्या च्लोले अॅना व लारा विल्टन जोडीचा ११-७, ११-४, ११-३ असा पराभव केला. मनिका बात्र व दिया चितळे या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी मॉरिशियसच्या ओमेहानी होसेनाली व नंदेश्वरी जलीम यांचा ११-५, ११-५, ११-३ असा पराभव केला.
- #TableTennis अचंथा शरथ कमल याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या याँग आयझॅकचे आव्हान ११-६, ११-७, ११-४, ११-७ असा परतावून लावले. सनिल शेट्टीला इंग्लंडच्या लिएम पिचफोर्डकडून ११-९, ६-११, ८-११, ८-११, ४-११ असा पराभव पत्करावा लागला. साथियन ज्ञानसेकरन याने चुरशीच्या सामन्यात इंग्लंडच्या सॅम वॉकरवर ११-५, ११-७, ११-५, ८-११, १०-१२, ११-९ असा ४-२ विजय मिळवला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत श्रीजा अकुलाला ३-४ अशा फरकाने सिंगापूरच्या तिनवेई फेंगकडून हार मानावी लागली.