Commonwealth Games 2022 : दीनेश कार्तिकच्या 'साडू' ने जिंकले ऐतिहासिक पदक; राष्ट्रकुल स्पर्धेत फडकावला तिरंगा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 10:49 PM2022-08-03T22:49:08+5:302022-08-03T22:49:37+5:30
Commonwealth Games 2022 Squash : भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल ( Saurav Ghosal) ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकून दिले.
Commonwealth Games 2022 Squash : भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल ( Saurav Ghosal) ने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकून दिले. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये एकेरीचे पदक पटकाणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला.
#Squash men's singles bronze medal match त्याच्यासमोर इंग्लंडच्या जेम्स विलस्ट्रॉफचे आव्हान होते आणि त्याच्याविरुद्धची सौरवची जय-पराजयाची आकडेवारी ही १-८ अशी निराशाजनक होती. पण, त्याने पहिल्या गेममध्येच ११-६ असा झटपट विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये सौरवने ८-१ अशी मजबूत आघाडी मिळवली होती आणि त्यानंतर सलग तीन गुण घेत हा गेमही ११-१ असा जिंकून २-० अशी आघाडी मजबूत केली.
सौरवचे एकहाती वर्चस्व जाणवत होते आणि तिसऱ्या गेममध्येही त्याने गुणाचे खाते उडघले. इंग्लंडच्या खेळाडूने डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु सौरवने ५-१ अशी आघाडी घेतली. जेम्सने ३-५ अशी पिछाडी कमी करताना सामन्यातील आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. आता एकेका गुणासाठीचा संघर्ष जोर पकडताना दिसला. सौरवने सलग तीन गुण घेत आघाडी ८-३ अशी मजबूत केली. त्यानंतर १०-४ अशी आघाडी घेत मॅच पॉइंट मिळवला आणि ११-४ अशा विजयासह कांस्यपदक नावावर केले.
क्रिकेटपटू दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) आणि सौरव हे नात्याने साडू आहेत. कार्तिकची पत्नी दिपीका पल्लिकल हिची बहिण दिया हिच्यासोबत सौरवने १ फेब्रुवारी २०१७ साली विवाह केला होता.
सौरव घोषालची कामगिरी
जागतिक दुहेरी अजिंक्यपद स्पर्धा
- २०२२ मध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक
- २००४ चे दुहेरीत रौप्यपदक
- २०१६मध्ये मिश्र दुहेरीत रौप्यपदक
- राष्ट्रकुल स्पर्धा - २०१८ मिश्र दुहेरीत रौप्यपदक
आशियाई स्पर्धा
- २०१४ सांघिक गटातील सुवर्णपदक
- २०१४ एकेरीत रौप्यपदक
- २००६, २०१० व २०१८ एकेरीत कांस्यपदक
- २०१० व २०१८ सांघिक गटातील कांस्यपदक
- #Weightlifting महिलांच्या ८७ किलो वजनी गटात पूर्णिमा पांडेला पदक पटकावता आले नाही. स्नॅच प्रकारात पूर्णिमाने १०३ किलोचा सर्वोत्तम भार उचलला. क्लिन अँड जर्कमध्ये तिने १२५ किलो भार उचलून एकूण २२८ किलो वजन उचलले. पण, पदकासाठी हा प्रयत्न अपूरा ठरला. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
- #Boxing नितू घांगासने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२मधील बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक पक्के केले. ४५-४८ किलो वजनी गटात तिने उपांत्यपूर्व फेरीत तिने नॉर्दर्न आयर्लंडच्या निकोल क्लाईडचा पराभव करून सेमी फायनल गाठली.
- #Boxing मोहम्मद हुस्सामुद्दीनने ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारून आणखी एक पदक पक्के केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने नामिबियाच्या ट्रायागेन एनडेव्हेलोवर ४-१ असा विजय मिळवला.