Commonwealth Games 2022 : भारताच्या गुरदीप सिंगने पाकिस्तानच्या खेळाडूला दिली टफ फाईट, ३९० किलो वजन उचलून जिंकले कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:53 AM2022-08-04T00:53:37+5:302022-08-04T00:58:12+5:30
Commonwealth Games 2022 Weightlifting : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या दोन वेटलिफ्टिंगपटूंनी आज दोन पदकांची कमाई केली.
Commonwealth Games 2022 Weightlifting : भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने ( Lovepreet Singh) १०९ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. त्याने एकूण ३५५ किलो ( १६३ + १९२ ) वजन उचलून कांस्यपदक नावावर केले. लवप्रीतने या कामगिरीसह क्लिन अँड जर्कमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्याच्यानंतर मध्यरात्री झालेल्या १०९+ किलो वजनी गटात गुरदीप सिंगने कमाल केली. त्याने कडवी टक्कर देताना स्पर्धा विक्रम नावावर केले, परंतु पाकिस्तान व न्यूझीलंडचे खेळाडू वरचढ ठरले.
It's Raining Medals for 🇮🇳 at @birminghamcg22 🤩
— SAI Media (@Media_SAI) August 3, 2022
Fantastic effort from #GurdeepSingh to bag 🥉 with a total lift of 390Kg in the Men's 109+kg Finals🏋♂️ at #B2022
Snatch- 167kg
Clean & Jerk- 223kg (PB)
With this #TeamIndia 🇮🇳 wins 🔟th Medal in weightlifting 💪#Cheer4Indiapic.twitter.com/iYGNPylCJ9
दरम्यान महिलांच्या ८७ किलो वजनी गटात पूर्णिमा पांडेला पदक पटकावता आले नाही. स्नॅच प्रकारात पूर्णिमाने १०३ किलोचा सर्वोत्तम भार उचलला. क्लिन अँड जर्कमध्ये तिने १२५ किलो भार उचलून एकूण २२८ किलो वजन उचलले. पण, पदकासाठी हा प्रयत्न अपूरा ठरला. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
१०९+ गटात गुरदीपने स्नॅच प्रकारात १६७ किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये १७३ किलोसह स्पर्धा विक्रम नोंदवणाऱ्या पाकिस्तानच्या मुहम्मद नूह दस्तगिरकडून त्याला कडवी टक्कर मिळाली. गुरदीपचा १७३ किलोचा प्रयत्न अयशस्वी ठरला. क्लिन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात २०७ किलो वजन उचलून तो आघाडीवर घेतली. पण, २१५ किलो उचलण्याचा दुसरा प्रयत्न फसला. त्यामुळे पदक शर्यतीत कायम राहण्यासाठी त्याने तिसऱ्या प्रयत्नाचा भार २२० किलो इतका केला. सामोआच्या पेटेलो तुएलोमा लाउतूसीचा २१५ किलोचा प्रयत्न फसल्याने त्याला ३७१ किलोसह चौथ्या क्रमांकावर रहावे लागले.
न्यूझीलंडच्या डेव्हीड अँड्य्रूने २१८ किलो भार उचलून नवा स्पर्धा विक्रम नोंदवला, त्याने एकूण ३८८ किलो वजन उचलण्याचा स्पर्धा विक्रमही नावावर केला. त्यामुळे गुरदीपने पुन्हा वजन २२३ किलो इतके वाढवले आणि त्याने ते यशस्वी पेललेही. त्याने २२३ चा स्पर्धा विक्रम व एकूण ३९० चा स्पर्धा विक्रम एका झटक्यात नावावर केला. आता त्याच्या आणि सुवर्णपदकामध्ये अँड्य्रू व पाकिस्तानचा दस्तगिर होता. अँड्य्रूने २२४ किलोचा भार उचलताना पुन्हा दोन्ही स्पर्धा विक्रम नावावर केले. पाकिस्तानच्या दस्तगिरने पहिल्याच प्रयत्नात २२५ किलो भार उचलून एकूण ३९८ किलोसह स्पर्धा विक्रम नावावर केला अन् सुवर्णपदकही. भारताच्या गुरदीपला ३९० किलोसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.