Commonwealth Games 2022: भारताला मोठा धक्का, ऑलिम्पिकविजेता नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:51 PM2022-07-26T12:51:56+5:302022-07-26T12:53:30+5:30
Commonwealth Games 2022: टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आणि नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकविजेता भालाफेकपटू Neeraj Chopra राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
नवी दिल्ली - या आठवड्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. गतवर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता आणि नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे नीरज चोप्राला राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय क्रीडापटू नेहमीच चांगली कामगिरी करत असतात. दरम्यान, यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समधील भालाफेक या क्रीडा प्रकारात भारताला ऑलिम्पिकविजेता नीरज चोप्रा याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र आपण दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे नीरज चोप्रा याने म्हटले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये नीरज चोप्राचा सामना हा ५ ऑगस्ट रोजी होणार होता. त्याच दिवशी भालाफेक स्पर्धा होणार होती. आता या क्रीडाप्रकारात भारताच्या अपेक्षा ह्या डी.पी. मनू आणि रोहित यादव यांच्यावर असतील. भालाफेकमध्ये हे दोघे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
गतवर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात भारताला मिळालेले ते पहिले सुवर्णपदक ठरले होते. तसेच नुकत्याच आटोपलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रा याने रौप्य पदक जिंकले होते.