राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी भारतात रंगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:34 AM2020-02-25T01:34:58+5:302020-02-25T01:35:11+5:30
भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल.
लंडन : भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) याची माहिती देताना म्हटले की, ‘दोन्ही स्पर्धांतील पदकांचा राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप समारंभानंतर एका आठवड्याने अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल.’
सीजीएफने स्पष्ट केले की, ‘२१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.’ या निर्णयाकडे भारताचा मोठा विजय म्हणून बघण्यात येत आहे. भारताने नेमबाजीला वगळण्यात आल्यानंतर २०२२ बर्मिंगहॅम खेळावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.
सीजीएफने स्पष्ट केले की, ‘भारतात राष्ट्रकुल तिरंदाजी व नेमबाजी अजिंक्यपदचे आयोजन २०२२ मध्ये होईल. यासोबत जुळलेल्या प्रकरणाला सीजीएफच्या कार्यकारी बोर्डाने मंजुरी दिली.’ या दोन्ही स्पर्धांचे आयोजन चंदीगडमध्ये जानेवारी २०२२ मध्ये होईल, तर राष्ट्रकुल स्पर्धा २७ जुलै ते ७ आॅगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे.
सीजीएफतर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘या निर्णयामुळे स्पष्ट झाले की, चंदीगड २०२२ व बर्मिंगहॅम २०२२ वेगवेगळ्या राष्ट्रकूल स्पर्धा असतील. याचा अर्थ बर्मिंगहॅम स्पर्धेनंतर एका आठवड्याने सीजीएफ पदक तालिका जाहीर करेल. त्यात चंदीगड २०२२ राष्ट्रकूल नेमबाजी व तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील पदकांचा प्रतिस्पर्धी देशांच्या वैध मानांकनाच्या रुपाने जाहीर करण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)