चीनच्या तुलनेत आम्ही मागेच
By admin | Published: July 1, 2017 02:01 AM2017-07-01T02:01:44+5:302017-07-01T02:01:44+5:30
बॅडमिंटनमध्ये भारत चीनच्या तुलनेत अद्याप बराच मागे असून या खेळात सुपरपॉवर बनण्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनाची गरज असल्याचे मत
नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये भारत चीनच्या तुलनेत अद्याप बराच मागे असून या खेळात सुपरपॉवर बनण्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.
गोपीचंद म्हणाले, ‘माझ्यामते आम्ही चीनच्या तुलनेत बरेच मागे आहोत. खरेतर चीनच्या खेळाडूंसोबत तुलना करणे हा आमच्या खेळाडूंवर अन्याय ठरेल. आमचे खेळाडू टप्याटप्यात चांगली कामगिरी करतात. विश्व चॅम्पियनशिप, आॅलिम्पिक आणि आॅल इंग्लंड अशा स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीची गरज आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर अशा स्पर्धा जिंकणे शक्य आहे.’
आमच्याकडे आमचे खेळाडू तर सरस कामगिरी करतात पण कोच, सहयोगी स्टाफ आणि मॅनेजर सर्वोत्कृष्ट दर्जाचे नाहीत, असे माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन गोपीचंद यांचे मत आहे. किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटनपटूंनी अलीकडे देदीप्यमान कामगिरी केली. महिला आणि पुरुषांच्या गेल्या सहापैकी चार सुपर सिरिज स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपनचे जेतेपद पटकविल्यानंतर प्रणितने सिंगापूर ओपनचा स्वत:चा पहिला सुपरसिरिज किताब जिंकला. त्यानंतर श्रीकांतने इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सलगपणे चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.
गोपीचंद यांनी स्थानिक स्पर्धांचा स्तर आणि ढिसाळ प्रशासन यावर टीका केली. ते म्हणाले,‘आमच्या स्थानिक स्पर्धांचा स्तर आणि प्रशासन दर्जेदार नाही. आमच्याकडे अद्यापही १९९१ सारख्याच स्पर्धांचे आयोजन होते. गेल्या २५ वर्षांपासून साचेबद्ध व्यवस्थेत आम्ही काम करीत आहोत. राष्ट्रीय चॅम्पियनशिप, रँकिंग राबविताना साचेबद्ध विचारांमुळे गेली २५ वर्षे आम्ही एकसारखे कोच तयार करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)