प्ले आॅफच्या चौथ्या स्थानासाठी स्पर्धा

By admin | Published: May 3, 2017 12:36 AM2017-05-03T00:36:06+5:302017-05-03T00:36:06+5:30

आयपीएलचे दहावे पर्व संपण्यास जवळपास १९ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि प्ले आॅफमध्ये कोणते संघ जाणार, हे आता जवळपास

The competition for the fourth place of the Playoffs | प्ले आॅफच्या चौथ्या स्थानासाठी स्पर्धा

प्ले आॅफच्या चौथ्या स्थानासाठी स्पर्धा

Next

 - अयाझ मेमन -
आयपीएलचे दहावे पर्व संपण्यास जवळपास १९ दिवस शिल्लक राहिले आहेत आणि प्ले आॅफमध्ये कोणते संघ जाणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यातही तीन संघ असे आहेत ज्यांच्या प्ले आॅफ प्रवेशाबाबत मला खात्री आहे. एक म्हणजे मुंबई इंडियन्स, हा संघ आधीच प्ले आॅफमध्ये पोहोचला आहे.
वानखेडेवर आरसीबीला नमवून १६ गुणांसह त्यांनी दिमाखात आगेकूच केली. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स खूप मजबूत संघ दिसत आहे. त्यासोबत सनरायझर्स हैदराबादही लक्षवेधी ठरले आहेत. हे तीन संघ असे आहेत, ज्यांचे आणखीन सामने बाकी आहेत आणि अजून गुण मिळवण्याची त्यांना संधी आहे. परंतु, प्ले आॅफमध्ये पोहचणारा चौथा संघ कोणता असेल, हा मोठा प्रश्न आहे. कारण रायझिंग पुणे सुपरजायंट हा सुरुवातीला खूप कमजोर दिसत होता. पण, त्यांनी नंतर जबरदस्त  सातत्य राखताना गुणतालिकेत झपाट्याने आगेकूच केली. तसेच  त्यांचे प्रमुख खेळाडूही फॉर्ममध्ये  आले आहेत. त्याचप्रमाणे किंग्ज
इलेव्हन पंजाब हा संघही उशीरा का होईना, पण चांगल्या फॉर्ममध्ये आला आहे. त्यामुळे या संघांमध्ये चौथ्या स्थानासाठी स्पर्धा असेल.
तळाला असलेले आरसीबी, दिल्ली आणि गुजरात या संघासाठी जवळपास ही स्पर्धा संपल्यात जमा आहे. तरी आयपीएलमध्ये हे सांगणे कठीण आहे, की कोणता संघ जिंकेल.  तसेच, माझ्या मते हा आयपीएलचा पहिला असा मोसम आहे ज्यात जवळपास दोन आठवड्यांपूर्वीच प्ले आॅफमधील  पहिले तीन संघ कोणते असतील, ते कळाले आहे. याआधी असे कधी झाले नाही आणि ती उत्सुकता अखेरपर्यंत कायम असायची. त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की तळाचे संघ खूप कमजोर ठरले. संघ समतोल नव्हता, खेळाडूंच्या  दुखापती किंवा खेळाडूंची निराशाजनक कामगिरी, हे यामागचे कारण असू  शकेल.
आरसीबी संघाचेच उदाहरण घ्या. मागच्या वर्षी हा संघ अंतिम सामन्यात खेळला. यावर्षीही हा संघ मजबूतीने खेळेल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, सुरुवातीपासूनच हा संघ दुखापतींना सामोरा गेला. मिशेल स्टार्क दुखापतीमुळे आलाच नाही. विराट कोहली एक आठवडा खेळला नाही, एबी डिव्हिलियर्सही दुखापतग्रस्त होता.
हा संघ माझ्यामते गेल, डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीवर अधिक अवलंबून होता. तिघांनीही काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत, पण एकत्रितपणे त्यांची कमगिरी खराब झाली आहे.  केएल राहुलही नसल्याने त्यांची फलंदाजी काहीशी कमाजोर पडली. तसेच, दिल्ली संघाची फलंदाजी मजबूत आहे, परंतु जे युवा खेळाडू आहेत, ते दबावाला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकले नाहीत. गोलंदाजीदेखील चांगली आहे. अनुभवी झहीर खानने चांगल्या गोलंदाजीसह चांगले नेतृत्त्व केले. मात्र त्यांना छाप पाडण्यात अपयश आले.
गुजरात लायन्स आपल्या फलंदाजांवर अधिकपणे अवलंबून होते. त्यांची फलंदाजी जबरदस्त तगडी आहे. मॅक्क्युलम, अ‍ॅरोन फिंच, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, रवींद्र जडेजा अशी फौज त्यांच्याकडे आहे. परंतु, जर तुमच्याकडे गोलंदाज नसतील तर प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही बाद कसे करणार? त्यामुळे हे तीन संघ अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे पुणे संघासाठी
त्यांचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्स निर्णायक ठरणार आहे. गुजरातविरुद्ध  तो ज्या पद्धतीने खेळला तो खेळ  त्याने कायम राखला तर हा संघ खूप मजबूत होईल. सुरुवातीला पुण्याची गोलंदाजीही कमजोर दिसत होती, पण नंतर त्यांचे प्रमुख खेळाडू हळूहळू फॉर्ममध्ये आले आहेत. त्यामुळे प्ले आॅफमधील चौथ्या स्थानासाठी पुणे संघ मोठा दावेदार आहे.

Web Title: The competition for the fourth place of the Playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.