स्पर्धा भ्रष्टाचारमुक्त राहील
By Admin | Published: March 7, 2016 03:16 AM2016-03-07T03:16:56+5:302016-03-07T03:16:56+5:30
भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
मुंबई : भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्चपासून प्रारंभ होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद भ्रष्टाचारविरोधी समितीचे प्रमुख सर रोनी फ्लॅनगन यांनी स्पष्ट केले.
फ्लॅनगन म्हणाले, ‘‘आयसीसीच्या यापूर्वीच्या प्रमुख स्पर्धांप्रमाणे या वेळीही खेळाडू व अन्य व्यक्तींसाठी गैरव्यवहाराबाबत माहिती देण्यासाठी २४ तास खुली राहणारी हॉटलाईन तयार करण्यात आली आहे. मानवी प्रवृत्ती लक्षात घेता गैरव्यवहाराच्या धोक्याचा समूळ नायनाट करणे अशक्य आहे.’’
पत्रकार परिषदेत बोलताना फ्लॅनगन म्हणाले, ‘‘विश्व टी-२० चॅम्पियनशिपमध्ये महिला व पुरुष अशा दोन्ही विभागांमध्ये एकूण ५८ सामने होणार आहेत. हा अनुभव अविस्मरणीय ठरेल, अशी आशा आहे. या स्पर्धेनंतर चाहत्यांनी क्रिकेट आणि तेथील अनुभवांबाबत चर्चा करावी, याला प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धा भ्रष्टाचारमुक्त राहील, यासाठी प्रयत्नशील आहोत. भ्रष्टाचार रोखणे आणि खेळात भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न हाणून पाडणे, आमचे मुख्य कार्य आहे. आम्ही खेळाडू, सपोर्ट स्टाफ व सामनाधिकारी यांच्यासाठी प्रबोधन कार्यक्रम राबविला आहे. कुठल्याही संशयित व्यक्तीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती आम्हाला मिळायला हवी. अशा व्यक्तीबाबत तक्रार केली नाही तर आयसीसी भ्रष्टाचारविरोधी संहितेनुसार तो गुन्हा ठरेल.’’
आयसीसी हॉटलाईनबाबत बोलताना फ्लॅनगन म्हणाले, ‘‘मी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या हॉटलाईनबाबत बोलत आहे. आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेसाठी असलेल्या हॉटलाईनमध्ये भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर आहे. त्यांना मोबाईल २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.