क्रिकेटपटूंचे संमिश्र यश
By admin | Published: June 19, 2015 02:10 AM2015-06-19T02:10:33+5:302015-06-19T02:10:33+5:30
बुधवारी पार पडलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये एका बाजूला राजकीय व्यक्तींनी बाजी मारलेली
मुंबई : बुधवारी पार पडलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीमध्ये एका बाजूला राजकीय व्यक्तींनी बाजी मारलेली दिसत असताना दुसऱ्या बाजूला क्रिकेटपटूंना मात्र संमिश्र यश मिळाल्याचे दिसून आले. दिलीप वेंगसरकर आणि प्रवीण आमरे या माजी क्रिकेटपटूंचा अपवाद वगळता या निवडणूकीमध्ये उभे असलेल्या इतर क्रिकेटपटूंना पराभवाचे तोंड पाहावे लागले.
विशेष म्हणजे, अध्यक्षपदी निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (१७६) यांच्या पवार - म्हाडदळकर गटाचे उपाध्यक्षपदी निवड झालेल्या दिलीप वेंगसरकर (१९५) यांनी पवार यांच्याहून अधिक मते मिळवताना बाजी मारली. त्याचवेळी कार्यकारिणी सदस्यपदासाठी निवड झालेले माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी १७० मते मिळवली. आमरे यांच्या रुपाने डॉ. विजय पाटील यांच्या ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाचा एकमेव उमेदवार कार्यकारीणी सदस्यपदी निवडणून आला.
उपाध्यक्षपदी व सह-सचिवपदी निवडणूक लढवलेले क्रिकेट फर्स्ट गटाचे उमेदवार अनुक्रमे अॅबी कुरविल्ला व लालचंद राजपूत या दोन्ही माजी क्रिकेटपटूंचा पराभव झाला. चार वर्षांपूर्वी विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये वेंगसरकर यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी पवारांच्या गटातून उपाध्यक्षपदी निवडणूक लढवताना दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मते मिळवली. कार्यकारिणी सदस्यपदावर निवड झालेले अरमान मलिक यांना सर्वाधिक २०५ मते पडली.
दुसऱ्या बाजूला पराभूत क्रिकेट फर्स्टच्या गटातून प्रवीण आमरे या एकमेव माजी क्रिकेटपटूची निवड झाली. तर मुंबईचे माजी फिरकीपटू संजय पाटील यांना देखील पराभवास सामोरे जावे लागले. क्रिकेट क्लब आॅफ इंडियाचे (सीसीआय) माजी फिरकीपटू मयांक खांडवाला यांना खजिनदारपदासाठी नितीन दलाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकूणच ही निवडणूक क्रिकेटपटूंसाठी ‘फिफ्टी-फिफ्टी’ अशीच ठरली.
दोघांचा विजय
पवार - म्हाडदळकर गटातून दिलीप वेंगसरकर आणि क्रिकेट फर्स्ट गटातून प्रवीण आमरे या माजी क्रिकेटपटूंनीच केवळ बाजी मारली. इतर नावाजलेल्या माजी क्रिकेटपटूंपैकी अन्य कोणालाही विशेष छाप पाडता आली नाही.