धरमशाला व दिल्लीमध्ये सामने होण्याचा आयसीसीला विश्वास

By admin | Published: March 7, 2016 11:31 PM2016-03-07T23:31:54+5:302016-03-07T23:31:54+5:30

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान धरमशाला येथे होणाऱ्या टी-२० विश्वकप लढतीबाबत अनिश्चितता कायम असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लढती नियोजित स्थळी होणार असल्याचा विश्वास सोमवारी व्यक्त केला

Confidence in ICC Cricket World Cup in Dharamshala and Delhi | धरमशाला व दिल्लीमध्ये सामने होण्याचा आयसीसीला विश्वास

धरमशाला व दिल्लीमध्ये सामने होण्याचा आयसीसीला विश्वास

Next

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान धरमशाला येथे होणाऱ्या टी-२० विश्वकप लढतीबाबत अनिश्चितता कायम असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लढती नियोजित स्थळी होणार असल्याचा विश्वास सोमवारी व्यक्त केला. सध्या लढतींचे स्थळ बदलण्याचा कुठला विचार नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. फिरोजशहा कोटला मैदानाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत चिंता नसल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले, ‘‘या दोन्ही स्थळांवर सामने आयोजिण्याचे आव्हान आहे, पण आम्ही त्यावर तोडगा शोधत आहोत. स्थळांची घोषणा वर्षभरापूर्वी झाली असून सर्व तयारी झाली आहे. स्थळांबाबत आव्हान पेलावे लागणार आहे. पण त्यात बीसीसीआय किंवा आयसीसीची कुठली चूक नाही. या दोन्ही मैदानावर सामने होतील.’’
पाकिस्तानचे दोनसदस्यीय पथक सोमवारी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी भारतात दाखल झाले. पाकिस्तानची सलामी लढत कोलकातामध्ये १६ मार्च रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान १९ मार्च रोजी धरमशाला येथे सामना होणार आहे. पण हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहून सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. रिचर्डसन म्हणाले, ‘‘भारत सरकारने सर्व सामन्यांसाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था प्रदान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीसी या प्रकरणात बीसीसीआय व पीसीबीसोबत चर्चा करीत आहे. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी, यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे.’’ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेतली तर आयसीसी त्यांच्यावर कारवाई करणार का, याबाबत बोलताना रिचर्डसन म्हणाले, ‘‘पाकिस्तान स्पर्धेवर बहिष्कार टाकणार नाही. चर्वितचर्वणावर माझा विश्वास नसून अशी स्थिती निर्माण होणार नाही.’’
धर्मशालाव्यतिरिक्त दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीबाबतही अनिश्चितता आहे. कारण डीडीसीएला स्थानिक प्रशासनाकडून विविध बाबींसाठी मंजुरी मिळवता आलेली नाही.’’ बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दोन्ही स्थळांवर टी-२० सामने होण्याची आशा व्यक्त केली आहे.
ठाकूर म्हणाले, ‘‘दोन्ही स्थळांची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली आहे. त्यामुळे यात आयसीसी किंवा बीसीसीआयची कुठलीच चूक नाही. राज्य सरकारने उच्च न्यायालयात सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था पुरवणार असल्याचे म्हटले आहे. डीडीसीएमध्ये मंगळवारपर्यंत सर्व औपचारिकता पूर्ण होतील आणि सर्व समस्यांवर तोडगा निघेल.’’ (वृत्तसंस्था)
> अमृतसर : भारतातील सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानचे पथक धरमशाला येथे दाखल झाले. भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान टी-२० विश्वकप स्पर्धेतील लढत येथे खेळली जाणार आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे लाहोर येथील संचालक उस्मान अन्वर आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य सुरक्षा अधिकारी कर्नल (सेवानिवृत्त) आजम खान वाघा सीमेवरून धरमशालासाठी रवाना झाले. डॉ. अन्वर यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यातर्फे पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा सदस्यांच्या समितीमध्येही समावेश आहे. पथकातील तिसरे सदस्य भारतातील पाकिस्तानचे उपउच्चायुक्त उबेद नजमानी आहेत.
> नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली आयोजित
टी-२० विश्वकप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना प्रत्येक सामन्यासाठी २५० व्हिसा मिळतील. त्यात धरमशाला येथे भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीचाही समावेश आहे.
गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘आतापर्यंत आम्ही पाकिस्तान संघाच्या प्रत्येक लढतीसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांना २५० व्हिसा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याचे तिकीट, प्रवासाचे (रेल्वे, रस्ता किंवा विमान) रिटर्न तिकीट आणि हॉटेल बुकिंगच्या कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतरच पाच दिवस कालावधीचा व्हिसा जारी
करण्यात येईल.’’

पाकिस्तान संघाने उपांत्य किंवा अंतिम फेरी गाठली तर व्हिसाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांवर सुरक्षा एजन्सीची नजर राहणार आहे. कारण यापूर्वीही अनेकदा पर्यटक गायब झाले असल्याचा अनुभव आहे.
पाकिस्तान संघ १९ मार्च रोजी भारताविरुद्ध धर्मशाला येथे सामना खेळणार आहे. याव्यतिरिक्त मोहालीमध्ये पाक संघ न्यूझीलंड (२२ मार्च) आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध (२५ मार्च) खेळणार आहे. पाकिस्तान संघ १६ मार्च रोजी कोलकातामध्येही एक सामना खेळणार आहे.

Web Title: Confidence in ICC Cricket World Cup in Dharamshala and Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.