पाहुण्या संघाचा आत्मविश्वास बळावला

By admin | Published: October 23, 2016 03:17 AM2016-10-23T03:17:35+5:302016-10-23T03:17:35+5:30

अखेर पाहुण्या संघाला जल्लोषाची संधी मिळाली. दिल्लीतील सामन्यात निसटता का होईना, पण विजय मिळाल्याने न्यूझीलंड संघाने पार्टी केली असेल. त्यांचा कर्णधार केन

The confidence of the visitors team has been strengthened | पाहुण्या संघाचा आत्मविश्वास बळावला

पाहुण्या संघाचा आत्मविश्वास बळावला

Next

- सुनील गावसकर लिहितो़

अखेर पाहुण्या संघाला जल्लोषाची संधी मिळाली. दिल्लीतील सामन्यात निसटता का होईना, पण विजय मिळाल्याने न्यूझीलंड संघाने पार्टी केली असेल. त्यांचा कर्णधार केन विलियम्सन हा या विजयाचा खरा हिरो म्हणावा लागेल. त्याने फिरोजशाह कोटला मैदानावर प्रेक्षणीय फलंदाजी केली. त्याची फलंदाजी कोहलीच्या फलंदाजी- सारखी तंत्रशुद्ध होती. त्यात दुर्बिणीने पाहिले तरी उणिवा सापडणार नाहीत इतकी. टॉम लॅथमने त्याला चांगली साथ दिली. लॅथमने आपल्या तंत्राने आणि संयमाने सर्वांना प्रभावित केले आहे. पाहुण्या संघात अनेक दिग्गज नावे आहेत, त्यांनी आता आपल्या नावाला साजेशी कामगिरी करण्याची वेळ आली आहे. हा विजय निसटता असला तरी या विजयामुळे भारतीय संघ मायदेशात ‘अपराजित’ नाही असा आत्मविश्वास पाहुण्या संघाला गवसला आहे, ते महत्त्वाचे.
सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी भारतीय गोलंदाजांचे कौतुक करावेच लागेल. कारण ज्यावेळी लॅथम आणि विलियम्सन हे खेळत होते. त्यावेळी हा संघ ३00 पार धावा करणार असे वाटत होते; परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना अडीचशेच्या आत रोखून भारतीय संघाला संधी निर्माण करून दिली.
भारतीय संघ पुन्हा एकदा चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरला. समोरच्या दिशेने खणखणीत षट्कार ठोकल्यानंतर रोहितचे बाद होणे आणि साउथीच्या बाउन्सरला तितक्याच ताकदीने फटकावणारा रहाणे लवकर बाद होणे भारतासाठी दु:चिन्ह ठरले. विराट कोहलीला त्याच्या घरच्या प्रेक्षकांना खूश करता आले नाही, लाजवाब कव्हर ड्राईव्ह ठोकणारा कोहली ज्या पद्धतीने बाद झाला ते क्रिकेटमध्ये दुर्दैवी समजले जाते. स्ट्रेट ड्राईव्हवर नॉनस्ट्रायकरवरील फलंदाज धावचित होण्यासारखेच हे दुर्दैवी आहे. केदार जाधव आणि धोनी यांच्यातील फुलणारी भागीदारी मोडल्याने भारताची विजयाकडील वाटचाल मंदावली. टीम साउथीने धोनीचा अप्रतिम परतीचा झेल टिपला आणि भारताच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या.
अक्षर पटेलला अष्टपैलू फलंदाज म्हणून आपली गुणवत्ता अजून सिद्ध करता आलेली नाही. हार्दिक पांड्याने निकराने केलेला प्रयत्न यशस्वी ठरला असता तर पार्टी करण्याचा योग भारतीय संघाच्या वाट्याला आला असता, पण पाहुण्या संघाने हा योग हिसकावून घेतला.
मोहालीची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्या रीतीने येत असल्याने येथे धावांचा पाऊस पडू शकतो. पाहुणा संघ आतापर्यंतची आपली कामगिरी मागे टाकून भरारी घेण्याचा प्रयत्न करेल. (पीएमजी)

Web Title: The confidence of the visitors team has been strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.