आक्रमक स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला
By admin | Published: December 8, 2015 11:50 PM2015-12-08T23:50:49+5:302015-12-08T23:50:49+5:30
फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.
नवी दिल्ली : फि रोजशाह कोटला मैदानावर चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी चहापानानंतर उमेश यादवच्या आक्रमक स्पेलच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या स्पेलनंतर आत्मविश्वास उंचावला असल्याची प्रतिक्रिया उमेशने व्यक्त केली.
यादवने सोमवारी अखेरच्या सत्रात ६ निर्धाव षटके टाकून ३ बळी घेतले. त्याने दुसऱ्या डावात २१ षटकांत १६ निर्धाव षटके टाकून ९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखविला.
यादव म्हणाला, ‘‘मला माझ्या कसोटी कारकिर्दीत ब्रेकमध्ये काही सामने खेळण्याची संधी मिळाली. मी सलग काही सामने खेळलेलो नाही. या स्पेलनंतर माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. मी आतापार्यंत कसोटी क्रिकेट खेळताना किंवा स्थानिक क्रिकेट खेळताना जे काही आत्मसात केले, ते सर्व या स्पेलमध्ये दाखविण्याची वेळ आली आहे, असे मला वाटले.’’
अखेरच्या सत्रासाठी मैदानात उतरण्यापूर्वीच्या मानसिकतेबाबत यादव म्हणाला, ‘‘आगामी ६ महिन्यांसाठी मला हा अखेरचा कसोटी सामना खेळायचा आहे. दक्षिण आफ्रिकेला ३-० ने पराभूत करण्याची संधी पुन्हा केव्हा मिळेल किंवा नाही, हे सांगता येत नाही. एक बळी मिळविला तर विजयाचा मार्ग मोकळा होईल, असे मला वाटत होते. मी केवळ एक बळी घेण्यासाठी प्रयत्नशील होतो.’’
यादवने डेन विलास व केली एबोट यांना इनस्विंगवर तंबूचा मार्ग दाखविल्यानंतर डेन पिएटला यष्टीमागे झेल देण्यास भाग पाडून कोटलावर भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला. यादव म्हणाला, ‘‘चहापानाच्या विश्रांतीदरम्यान कोन बदलून गोलंदाजी केल्यास चेंडू अधिक स्विंग होण्यास मदत मिळेल, अशी चचा केली. मी त्यानुसार मारा केला आणि यश मिळाले. मी या शैलीने चेंडू नेहमीपेक्षा अधिक स्विंग करू शकलो. चेंडू उशिरा स्विंग होत असल्यामुळे फलंदाजांनाही चेंडूबाबत अचूक अंदाज येत नव्हता.’’ (वृत्तसंस्था)