संघर्ष दौरा...अनिल कुंबळे येताच विराट कोहलीने सोडलं मैदान
By admin | Published: June 2, 2017 12:59 PM2017-06-02T12:59:41+5:302017-06-02T13:01:37+5:30
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याचं समोर येत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 2 - चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्याच्या हेतूने इंग्लंडमध्ये पोहोचलेल्या भारतीय क्रिकेट संघात सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्णधार विराट कोहली नेट प्रॅक्टिस करत असताना प्रशिक्षक अनिल कुंबळे तिथे पोहचले. मात्र यानंतर जे काही झालं ते पाहून मैदानात उपस्थित सर्वजण हैराण झाले. अनिल कुंबळे नेट्समध्ये पोहोचताच विराट कोहलीने काढता पाय घेतला. कुंबळे आल्यानंतर विराट कोहलीने सराव सोडला आणि थेट मैदानातून बाहेर निघून गेला.
मंगळवारी जेव्हा भारतीय संघ बांगलादेशविरोधात सराव सामना खेळणार होता त्यादिवशी हा सर्व प्रकार घडला. या सामन्याआधी कर्णधार आणि कोचमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. दोघांपैकी कोणीच काहीही बोललं नाही, मात्र त्यांच्या शारिरीक हालचालींमधून काहीतरी गडबड असल्याचं स्पष्ट कळत होतं. रविवारी भारत आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात सामना खेळण्यासाठी सज्ज असून दरम्यान कोहली आणि कुंबळेमधील वादामुळे संघाच्या कामगिरीवर फरक तर पडणार नाही ना याची चिंता लागली आहे.
चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ रवाना होत असतानाच बीसीसीआयने अनिल कुंबळेंचा करार संपत असल्याने प्रशिक्षक पदासाठी भर्ती सुरु करत असल्याची घोषणा केली होती. प्रशिक्षकपदाच्या या स्पर्धेत अनिल कुंबळेचं नावदेखील आहे. त्यांचीही पुन्हा निवड होऊ शकते. कुंबळेच्या नेतृत्वाखाली संघ इतकी चांगली कामगिरी करत असताना नवी प्रशिक्षकाची गरज काय ? असा सवाल विचारत अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीने कुंबळेच्या कडक शिस्तीची तक्रार सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीकडे केली होती. यानंतर हा वाद चर्चेच आला होता. दुसरीकडे रामचंद्र गुहा यांनी प्रशासकांच्या समितीमधून (सीओए) राजीनामा दिला असून त्यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणांचा हवाला दिला आहे. भारतीय प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळे यांच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चेसोबत या घटनेचा संबंध जोडला जात आहे.
दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. कुंबळे यांना प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी व इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या शर्यतीत सेहवाग सामील झाल्यामुळे लढतीला रंगत आली आहे. सेहवागला प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नाही, पण किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.