मीराबाई चानू आणि गुरुराजाचे मोदींकडून अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:07 AM2018-04-06T02:07:24+5:302018-04-06T02:07:24+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू आणि रौप्य विजेता पी. गुरुराजा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभिनंदन केले.
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण विजेती भारोत्तोलक मीराबाई चानू आणि रौप्य विजेता पी. गुरुराजा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभिनंदन केले. ‘तुमच्या कामगिरीवर देश खूश आहे’, असे मोदींनी टिष्ट्वट केले. भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिल्याबद्दल आणि विक्रमी कामगिरीबद्दल अभिनंदन, असे मोदींनी टिष्ट्वटमध्ये पुढे म्हटले आहे.
भारतीय आॅलिम्पिक संघटनेने(आयओए) पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. पुढील काही दिवसांत पदकांची संख्या झपाट्याने वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी दोन्ही पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. अन्य खेळाडू देखील अशीच विजयी कामगिरी करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. आयओए महासचिव राजीव मेहता यांनी ही झकास सुरुवात असल्याचे म्हटले आहे. भारतीय पथकाचे प्रमुख विक्रम सिसोदिया यांनी स्पर्धा पुढे सरकतील तसे आणखी मेडल्स येतील, असा विश्वास वर्तविला. (वृत्तसंस्था)
चानूचे विक्रमी सुवर्ण इतर खेळाडूंना प्रेरणादायी - नामदेव शिरगावकर
गोल्ड कोस्ट - राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच भारोत्तोलन महिलांच्या ४८ किलो वजन गटात एस. मीराबाई चानू हिने विक्रमी सुवर्ण आणि पुरुषांच्या ५६ किलोगटात पी. गुरुराजाने रौप्यपदक जिंकून चांगली सुरुवात करून दिली. हे दोन पदक संघातील इतर खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. भारतीय संघातील खेळाडंूची तयारी पाहता, गत राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत या वेळी जास्त पदके जिंकू असा विश्वास वाटतो, असे भारतीय पथकाचे उपप्रमुख नामदेव शिरगावकर यांनी दूरध्वनीद्वारे ‘लोकमत’ला सांगितले.
शिरगावकर म्हणाले, ‘ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने विक्रमी सुवर्णपदक जिंकून चांगली भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. भारतीय संघाच्या निवासस्थानी या सुवर्ण यशामुळे जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे, तिच्या या कामगिरीमुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंचाही उत्साह नक्कीच वाढणार आहे. भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, जलतरण, टेबल टेनिस, स्क्वॉश या क्रीडा प्रकारांतसुद्धा विजयी कामगिरी करत आश्वासक सुरुवात आहे. हॉकीमध्ये मात्र भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. वेल्स संघाकडून भारतीय महिलांचा निसटता पराभव झाला. आपल्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारतीय महिलांकडून काही चुकासुद्धा झाल्या, ज्याचा त्यांना फटका बसला. सुरुवातीला आक्रमक खेळ करताना त्यांनी चांगली सुरुवात केली होती; पण शेवट पराभवाने झाला. जलतरणमध्ये महाराष्टÑाचा आपला वीरधवल खाडेने ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात उपांत्य फेरी गाठली आहे.’
स्क्वॉशमध्ये धक्का
मुष्टियुद्धात मनोजकुमार दुसऱ्या फेरीत पोहोचला.स्क्वॉशमध्ये आपल्याला धक्का बसला आहे. सौरव घोषालला पुरुषांच्या एकेरीच्या दुसºया फेरीतून बाहेर व्हावे लागले. त्याला जमैकाच्या ख्रिस्टिफर बिन्नीकडून पराभव पत्करावा लागला. हा खेळ खरा इंग्रजांचा; पण तरीही आपले खेळाडू चांंगल्या तयारीचे आहेत. शुक्रवारी भारतीयांना सायकलिंगमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. भारोत्तोलन प्रकारात के. संजिता चानू, दीपक लाथर, सरस्वती आर. यांच्याकडून पदकांची अपेक्षा करण्यास हरकत नाही,’ असेही नामदेव म्हणाले.