मेरी कोम, चानू व हॉकी संघांचे राज्यसभेतर्फे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 11:29 PM2017-12-15T23:29:16+5:302017-12-15T23:29:23+5:30
राज्यसभेने शुक्रवारी महिला बॉक्सर मेरी कोम, भारोत्तोलक सायखोम मीराबाई चानू आणि पुरुष व महिला हॉकी संघांचे विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशासाठी अभिनंदन केले आणि भविष्यातही हे खेळाडू अशाच प्रकाराच्या यशाची पुनरावृत्ती करीत देशाचा गौरव वाढवतील, अशी आशा व्यक्त केली.
नवी दिल्ली : राज्यसभेने शुक्रवारी महिला बॉक्सर मेरी कोम, भारोत्तोलक सायखोम मीराबाई चानू आणि पुरुष व महिला हॉकी संघांचे विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशासाठी अभिनंदन केले आणि भविष्यातही हे खेळाडू अशाच प्रकाराच्या यशाची पुनरावृत्ती करीत देशाचा गौरव वाढवतील, अशी आशा व्यक्त केली.
शीतकालीन सत्राच्या पहिल्या दिवशी सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतर्फे खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले,‘मी २२ आॅक्टोबरला ढाका (बांगलादेश) येथे संपलेल्या आशिया कप २०१७ मध्ये जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचे आणि ५ नोव्हेंबर २०१७ मध्ये काकमिगाहारा (जपान) येथे आशिया कप २०१७ मध्ये जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन करतो.’
सभापतींनी ८ नोव्हेंबरला व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरामध्ये आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकण्यासाठी मेरी कोम आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक जिंकण्यासाठी चानूचे अभिनंदन केले.
मेरी कोम राज्यसभेची मनोनीत सदस्य आहे. पण, आज ज्यावेळी मेरीचे अभिनंदन करण्यात आले त्यावेळी ती सभागृहात उपस्थित नव्हती.
नायडू म्हणाले,‘या खेळाडूंनी आपल्या कामगिरीद्वारे देशाचा मान उंचावली. आंतरराष्ट्रीय पाताळीवर या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे भारतातील युवा पिढीला प्रेरणा मिळेल.’
भविष्यातही हे खेळाडू अशाच प्रकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती करतील, अशी आशा नायडू यांनी यावेळी व्यक्त केली. सदस्यांनी बाके वाजवून खेळाडूंचे अभिनंदन केले. (वृत्तसंस्था)