सांघिक कामगिरीचा विजय
By admin | Published: March 8, 2017 01:35 AM2017-03-08T01:35:24+5:302017-03-08T01:35:24+5:30
भारतीय संघाने काय जबरदस्त विजय मिळवला. कमी धावसंख्येच्या सामन्यात ७५ धावांनी विजय हा मोठा विजय समजला जावा, कारण भारताला फक्त १८७ धावांचा बचाव करायचा होता.
- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
भारतीय संघाने काय जबरदस्त विजय मिळवला. कमी धावसंख्येच्या सामन्यात ७५ धावांनी विजय हा मोठा विजय समजला जावा, कारण भारताला फक्त १८७ धावांचा बचाव करायचा होता. त्यामध्ये हे विजयाचे मार्जिन खूप मोठे मानले गेले पाहिजे.
खेळपट्टी गोलंदाजीला पोषक होती. परंतु, पहिला सामना हरल्यानंतर टीम इंडियाने ज्याप्रमाणे पुनरागमन केले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मी सर्वच खेळाडूंच्या कामगिरीची प्रशंसा करीन. कारण, दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी जी मालिकेतील एकमेव शतकी भागीदारी केली, ती अद्वितीय होती. सामनावीरचा पुरस्कार मिळवलेल्या के. एल. राहुलने अशा खेळपट्टीवर दोन्ही डावांत अर्धशतके झळकाने कठीण असते, परंतु त्याने दाखवून दिले की, तो कशा पद्धतीने आपल्या खेळाला प्राप्त परिस्थितीनुसार बदलू शकतो. गोलंदाजांनी तर कमालच केली. पहिल्या डावात रवींद्र जडेजा आणि दुसऱ्या डावात रविचंद्रन आश्विनने अतुलनीय कामगिरी केली. इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात केलेला मारा महत्त्वपूर्ण होता. कारण, यावेळी आॅस्ट्रेलिया संघ चांगल्या परिस्थितीत होता. या जोडगोळीने टिच्चून मारा करून पाहुण्या संघाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून परावृत्त केले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व.
संघाचे मनोधैर्य वाढावे, म्हणून तो प्रेक्षकांनाही टाळ्या वाजवण्यास उत्तेजित करीत होता. एकूणच हा एक सांघिक कामगिरीचा विजय होता. या विजयाने भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असली तरी मालिकेत भारताचे पारडे आता जड झाले आहे; कारण आता मानसिक दबाव आॅस्ट्रेलियन संघावर असेल. त्यातून त्यांना मालिकेत पुनरागमन करणे कठीण बनणार आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर आॅस्ट्रेलियाचे वर्चस्व होते. कालची नाबाद जोडी पुजारा आणि रहाणे हे दोघे पुढे मोठी खेळी करतील असे वाटत असताना आॅस्ट्रेलियन जलदगती जोडी हेजलवूड आणि स्टार्क यांनी सामन्यावर वर्चस्व गाजवून भारताचे सहा फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत पाठवले. या दोघांच्या कामगिरीमुळे आॅॅस्ट्रेलियाला टार्गेट मिळाले ते केवळ १८८ धावा करण्याचे. यावेळी भारत सामना हरतो की काय, अशी शंका वाटू लागली होती. भारताने सव्वादोनशे ते अडीचशे धावांची आघाडी घेतली असती तर बरे झाले असते, असे वाटत होते.
आस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला आश्विनने पुन्हा एकदा बकरा बनविले. खेळपट्टीवरील भेगांमुळे चेंडू कसाही वळण घेत असला तरी आपल्या अपारंपरिक फूटवर्कमुळे स्टिव्ह स्मिथला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. तो खेळपट्टीवर जोपर्यंत होता, तोपर्यंत आॅस्ट्रेलियाला विजयाची आशा होती; परंतु उमेश यादवने स्मिथचा बळी घेतला आणि सामना भारताच्या बाजूने झुकविला.
त्याचवेळी सामन्याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले होते. सांघिक कामगिरीने शेवटी एक शानदार विजय साकारला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारतीय खेळाडूंच्या देहबोलीवरून कधीही असे वाटत नव्हते की, ते हा सामना हरणार आहेत. ही सर्वांत मोठी गोष्ट होती.