कोंटाची दिमाखात उपांत्य फेरीत
By admin | Published: July 12, 2017 12:39 AM2017-07-12T00:39:54+5:302017-07-12T00:39:54+5:30
ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद करताना द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला धक्का देत पहिल्यांदा विम्ब्लडनच्या उपांत्य फेरीत धडक मारली
लंडन : ब्रिटनच्या जोनाथन कोंटाने अनपेक्षित विजयाची नोंद करताना द्वितीय मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला धक्का देत पहिल्यांदा विम्ब्लडनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना कोंटाने ६-७ (२-७), ७-६ (७-५), ६-४ अशी बाजी मारली.
दरम्यान आता उपांत्य फेरीत कोंटापुढे बलाढ्य व्हिनस विलियम्सचे तगडे आव्हान असेल. सध्या व्हिनसचा फॉर्म पाहता कोंटाला उपांत्य फेरीत विजय मिळवणे अत्यंत अवघड जाईल. हालेपने सामन्यात आश्वासक सुरुवात करताना पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होतली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये कोंटाने दमदार पुनरागमन करताना टायब्रेकमध्ये बाजी मारत सामना बरोबरीत आणला. यानंतर तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आक्रमक खेळ करताना कोंटाने हालेपचे आव्हान मोडून काढत दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरीत खांद्याच्या दुखापतीमुळे संघर्ष करावा लागल्यानंतर नोव्हाक जोकोव्हीचने फ्रान्सच्या एड्रियन मानेरिनोचा पराभव करीत नवव्यांदा या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या दुसऱ्या मानांकित जोकोव्हीचने मानेरिनोचा ६-२, ७-६, ६-४ ने पराभव केला. या लढतीदरम्यान तिसऱ्या सेटच्या पाचव्या गेमच्या वेळी त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. खांद्याच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी ४-३ असा स्कोअर असताना त्याला वैद्यकीय टाइमआऊटचा आधार घ्यावा लागला.
पहिल्या सेटच्या सुरुवातीच्या तीन गेम्सनंतरही त्याने वैद्यकीय मदत घेतली होती. ही लढती सुरुवातीला सोमवारी खेळली जाणार होती, पण अन्य लढती लांबल्यामुळे आयोजकांनी ही लढत आज खेळविण्याचा निर्णय घेतला. जोकोव्हीचला उपांत्यपूर्व फेरीत चेक प्रजासत्तकाच्या टॉमस बर्डीचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ११ व्या मानांकित बर्डीचने सोमवारी चौथ्या फेरीच्या लढतीत आठव्या मानांकित डोमिनिक थिएमचा ६-३, ६-७, ६-३, ३-६, ६-३ ने पराभव केला. जोकोव्हीच व बर्डीच यांच्यादरम्यान आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत त्यात सर्बियन खेळाडू जोकोव्हीचने २५ सामने जिंकले आहेत. (वृत्तसंस्था)