सातत्य कायम राखायचे आहे
By admin | Published: January 4, 2017 03:08 AM2017-01-04T03:08:10+5:302017-01-04T03:08:10+5:30
प्रीमियर लीग फुटबॉलच्या यंदाच्या सत्रात सलग १३ विजय मिळवून चेल्सी संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विशेष संघाच्या या कामगिरीत गोलरक्षक थिबौट कोर्टोइस याची भूमिका
-थिबौट कोर्टोइसशी बातचीत..
प्रीमियर लीग फुटबॉलच्या यंदाच्या सत्रात सलग १३ विजय मिळवून चेल्सी संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विशेष संघाच्या या कामगिरीत गोलरक्षक थिबौट कोर्टोइस याची भूमिका मोलाची ठरली आहे. विशेष म्हणजे स्पर्धेच्या गतमोसमात चेल्सीला टीम मॅनेजर जोस मुरिन्हो यांच्या हकालपट्टीनंतर १०व्या स्थानी समाधान मानावे लागले होते. मात्र, ती घटना लवकर विसरुन चेल्सीने फिनिक्स भरारी घेत यंदा थेट अव्वलस्थानी झेप घेतली आहे. सर्वांत जवळचे प्रतिस्पर्धी असलेले लिव्हरपूल आणि स्वत:मध्ये चेल्सीने ५ गुणांचे मोठे अंतर ठेवले आहे. आता चेल्सीपुढे आव्हान आहे ते लंडनमधील प्रतिस्पर्धी टॉटनहॅमचे. सध्या त्यांचीही यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी झाली असून, चेल्सी सलग १४वा विजय नोंदवणार का? याचीच उत्सुकता लागली आहे...
यंदाच्या मोसमात चेल्सीच्या कामगिरीत कितपत सातत्य राहील?
- नक्कीच आमची कामगिरी अभिमानास्पद आहे. सर्व काही सुरळीत सुरू असून सर्वाधिक गुणांसह आम्ही आनंदीत आहोत. पण आम्हाला संयम राखून कठोर मेहनत कायम ठेवावी लागेल. टॉटनहॅमचे आव्हान सोपे नसून त्यानंतर आम्हाला लिस्टरलाही जायचे आहे. हे आव्हान कठीण असून लिव्हरपूल, आर्सेनालला मागे टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
विजयाचे प्रबळ दावेदार आहात?
- जेतेपदाबाबत आताच न बोललेले ठीक आहे. फेब्रुवारीमध्ये आमची मजल कुठपर्यंत जाईल हे स्पष्ट होईलच. पण जर आम्ही आमच्या खेळावर लक्ष केंद्रीत करून कामगिरीत सातत्य ठेवले तर, विजयी घोडदौड कायम राखू.
या सत्राचे विश्लेषण कसे करशील?
- सध्याच्या विजयी कामगिरीकडे पाहून आम्ही गत मोसमाच्या तुलनेत चांगला खेळ करत आहोत. सध्या आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहोत. आम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असलो तरी, आम्हाला कठोर परिश्रम घेणे अनिवार्य आहे.
सलग १३ विजय आणि केवळ ४ गोल स्वीकारले. याचे गुपित काय?
- नक्कीच ही जबरदस्त कामगिरी आहे. कठोर सराव आणि सांघिक खेळामुळेच हे शक्य झाले. शिवाय आमची बचावफळी अधिक मजबूत आहे. यामुळे गोलरक्षक म्हणून मला अधिक मदत मिळत आहे. आर्सेनालविरुद्ध झालेल्या मोठ्या पराभवानंतर आम्ही बचावफळीत तीन खेळाडू खेळविण्याचा निर्णय घेतला जो आतापर्यंत चांगला यशस्वी ठरला.
आर्सेनालविरुध्द ०-३ चा पराभव तुम्हाला प्रेरणादायी ठरला का?
- आर्सेनालविरुद्धचा तो पराभव वेदनादायक होता. पण त्यानंतर आम्ही नव्या योजनेसह मुसंडी मारली. संघातील प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत आहे आणि आम्ही विजयी मार्गावर आहोत. (पीएमजी/इएसपी)