राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष- भारतीय क्रीडा विकासात क्रिकेटचे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 09:36 AM2021-08-29T09:36:16+5:302021-08-29T09:36:25+5:30
भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात.
भारतात क्रिकेटची वाढती लोकप्रियता नेहमी वादाचा मुद्दा राहिला आहे. विशेषत: अन्य खेळांचे पाठीराखे आणि पदाधिकारी नेहमीच क्रिकेटच्या तुलनेत भेदभाव होत असल्याचा आरोप करतात. तरीही सभ्य माणसाच्या या खेळाने देशाच्या क्रीडा विकासात मोठी भूमिका बजावली, ही बाब मान्य करावीच लागेल. १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघ चॅम्पियन बनल्यापासून खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काळानुसार अन्य खेळाडूंनाही ‘स्टारडम’ मिळू लागले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल बीसीसीआयने नीरज चोप्राला एक कोटीचा पुरस्कार दिला. भारताच्या क्रीडाविश्वात हे वगळे उदाहरण ठरावे. क्रिकेटची वाढती लोकप्रियता अन्य खेळाच्या विकासास कशी पूरक ठरली, हे जाणून घेऊ या...
विदेशी कोचेस
क्रिकेटसारख्या अन्य खेळामध्ये आता विदेशी कोचेसची सेवा घेण्याची वृत्ती वाढली. याचे चांगले निकाल पुढे आले आहेत. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनात भारताने २०११ चा वन डे विश्वचषक जिंकला, त्याचप्रमाणे ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याने जर्मनीचे कोच क्लॉज बार्टिनेत्झ यांच्या मार्गदर्शनात टोकियोत सुवर्ण जिंकले. पी. व्ही. सिंधूने द. कोरियाचे कोच ताई सॅंग यांच्या मार्गदर्शनात कांस्य पदक जिंकून सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकण्याची किमया साधली. पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनंतर कांस्यपदक विजेती कामगिरी केली ती देखील ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांच्याच मार्गदर्शनात.
प्रायोजकांचीही रुची वाढली
क्रिकेटशिवाय अन्य खेळांमध्ये आता प्रायोजक रुची दाखवू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण प्रो लीग कबड्डीचे देता येईल. कबड्डी टीव्हीवरून घरोघरी पोहोचली.
व्यावसायिक दृष्टिकोन
क्रिकेटसारखाच बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, मुष्टियुद्ध आदी खेळात आता व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्यात येत आहे. हा वेग मंद असला तरी उशिरा का होईना मात्र अन्य खेळावर याचा सकारात्मक परिणाम जाणवतो.
क्रीडाशक्तीच्या उंबरठ्यावर
आंतरराष्ट्रीय पटलावर खेळांना मिळणारे यश हे देशाच्या प्रगतीचे प्रतीक मानले जाते. मागच्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताला क्रीडाशक्तीच्या रूपाने ओळख लाभत आहे.
लहान शहरातील मोठे खेळाडू
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला. धोनी हा रांचीसारख्या लहान शहरातून उदयास आला. धोनीला आदर्श मानून लहान लहान शहरातून खेळाडू पुढे येऊ लागले. भारतीय महिला हॉकी संघ याचे मोठे उदाहरण आहे. ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीच्या बळावर हॉकी विश्वाला चकित करणाऱ्या महिला हॉकी संघातील अनेक खेळाडू, लहान शहरातील आणि गरीब-मागासलेल्या कुटुंबातून पुढे आल्या आहेत.
आर्थिक स्थिती सुधारली
क्रिकेटपटूंच्या तुलनेत अन्य खेळातील खेळाडूंच्या आर्थिक स्थितीत हवी तशी सुधारणा अद्याप झालेली नाही, ही सत्यता आहे. तथापि, मागील दशकापासून यात उल्लेखनीय सुधारणा घडून आली. आयपीएलच्या धर्तीवर आयोजित आयएसएल फुटबॉल, पीबीएल बॅडमिंटन, कुस्तीची प्रो रेसलिंग लीग आणि प्रो कबड्डी लीग यापासून खेळाडूंना फार मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.