पुणे संघाच्या कर्णधारपदी ‘कूल’ माही
By Admin | Published: January 19, 2016 03:19 AM2016-01-19T03:19:44+5:302016-01-19T03:19:44+5:30
इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स (आरपीएसजी) संघाच्या कर्णधारपदाची धुरा अपेक्षेप्रमाणे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार
कोलकाता : इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स (आरपीएसजी) संघाच्या कर्णधारपदाची धुरा अपेक्षेप्रमाणे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर सोपविण्यात आली आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी सोमवारी कर्णधार निवडीची घोषणा केली.
गोएंका यांनी संघाच्या लोगोच्या अनावरण कार्यक्रमात संघप्रमुखाचे नाव जाहीर केले. यापूर्वी धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार होता. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चेन्नई सुपरकिंग्ज संघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर धोनीची पुणे संघाने निवड केली होती. त्याच वेळी संघाच्या कर्णधारपदीदेखील त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. गोएंका यांनी सोमवारी त्याची औपचारिक घोषणा केली. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत एटलेटिको डी कोलकाता या संघाची मालकी गोएंका व सौरव गांगुली यांच्याकडे आहे. मात्र, पुणे संघात सौरवची कोणतीही भूमिका नसल्याचे गोएंका यांनी या वेळी स्पष्ट केले.