Copa America 2021: यजमान ब्राझीलची अंतिम फेरीत धडक, अटीतटीच्या सामन्यात पेरूचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 09:33 AM2021-07-07T09:33:56+5:302021-07-07T09:35:11+5:30

निल्टन सांतोस स्टेडियवर झालेल्या या सामन्यातील एकमेव गोल लुकास पाकेटा याने केला. या गोलचा सूत्रधार ठरला तो नेमार.

Copa America 2021 Hosts Brazil in final | Copa America 2021: यजमान ब्राझीलची अंतिम फेरीत धडक, अटीतटीच्या सामन्यात पेरूचा पराभव

Copa America 2021: यजमान ब्राझीलची अंतिम फेरीत धडक, अटीतटीच्या सामन्यात पेरूचा पराभव

googlenewsNext

रिओ दी जेनेरिओ : यजमान आणि संभाव्य विजेते असलेल्या बलाढ्य ब्राझीलने अपेक्षित कामगिरी करताना कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, यासाठी त्यांना पेरूच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागले. अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात पेरूला १-० असा धक्का देत ब्राझीलने अंतिम फेरी गाठली.

निल्टन सांतोस स्टेडियवर झालेल्या या सामन्यातील एकमेव गोल लुकास पाकेटा याने केला. या गोलचा सूत्रधार ठरला तो नेमार. हुकमी खेळाडू नेमार याने बचावपटू अलेक्झांडर कालेन्सकडून चेंडू घेत लुकासला अचूक पास केला आणि यावर गोल करत लुकासने ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी निर्णायक ठरवत ब्राझीलने दिमाखात अंतिम फेरी गाठली. ब्राझीलने आक्रमक खेळ करत सामन्यावर नियंत्रण राखले होते. मात्र, पेरूचा गोलरक्षक पेड्रो गोलेस याने शानदार बचाव करताना नेमार आणि रिचार्लीसन यांचे आक्रमण यशस्वीपणे रोखले.

साखळी फेरीत ब्राझीलने पेरूचा ४-० असा एकतर्फी पराभव केला होता. मात्र, यावेळी पेरूने ब्राझीलला जोरदार प्रत्युत्तर दिले. दुसऱ्या सत्रात जियांतुका लापाडुला याने अप्रतिम प्रयत्न करताना पेरूला बरोबरी साधण्याची संधी निर्माण करून दिली होती. मात्र, ब्राझीलचा गोलरक्षक एडरसन याने जियांतुकाची किक अडवली. दोन वर्षांआधी दुखापतीमुळे नेमार स्पर्धेत खेळू शकला नव्हता. 

मात्र, त्यानंतरही ब्राझीलने अंतिम फेरी गाठत पेरूला ३-१ असे नमवत जेतेपद पटकावले होते. विजयानंतर नेमारने अंतिम सामना अर्जेंटिनाविरुद्ध व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. नेमार म्हणाला की, ‘अंतिम लढत अर्जेंटिनाविरुद्ध व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्या संघात माझे अनेक मित्र आहेत आणि मला त्यांच्याविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. असे झाले तरी विजय ब्राझीलचाच होणार.’ त्याचवेळी, ब्राझीलचे प्रशिक्षक टोटे यांनी हा थकवा आणणारा सामना झाला, असे मान्य केले. ते म्हणाले की, ‘पेरूने जबरदस्त झुंज दिली आणि हा सामना खूप थकवा आणणारा ठरला. शारीरिक आणि मानसिकरीत्या परीक्षा पाहणारा हा सामना होता. कोपा अमेरिका मानसिक मॅरेथॉनपेक्षा कमी नाही.’ ब्राझीलने कोपा अमेरिका स्पर्धेच्या मागील १४ सत्रांपैकी ९ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

ब्राझीलमध्ये उत्सुकता युरो चषकाची!
ब्राझीलने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. रियो दी जिनेरिओ शहरातील प्रसिद्ध पिराक क्लबमध्ये स्वीमिंग पूलजवळ सर्व फुटबॉलप्रेमी अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमू लागले आहेत. अद्याप एक उपांत्य सामना शिल्लक आहे. मात्र, यावेळी लावण्यात येणाऱ्या भव्य स्क्रीनवर कोपा अमेरिका उपांत्य लढत नाही, तर युरो चषक उपांत्य फेरीतील इटली विरुद्ध स्पेन सामना दाखविण्यात येणार आहे. सध्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेपेक्षा युरो चषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता अधिक असल्याचे दिसून येत आहे. 
 

Web Title: Copa America 2021 Hosts Brazil in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.