कोपा अमेरिका - रोमहर्षक अंतिम फेरीत चिलीचा अर्जेंटिनावर ४-२ ने विजय
By Admin | Published: June 27, 2016 09:25 AM2016-06-27T09:25:21+5:302016-06-27T10:42:48+5:30
पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनावर ४-२ ने विजय मिळवत चिलीने सलग दुस-यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २७ - पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनावर ४-२ ने विजय मिळवत चिलीने सलग दुस-यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा मोक्याच्या क्षणी अपयशी ठरला. शूटआउटमध्ये मेसीला अर्जेंटिनासाठी गोल साकारता आला नाही.
या पराभवामुळे अर्जेंटिनाचे २३ वर्षानंतर पुन्हा एकदा कोपा अमेरिकेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. मोठया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा हा सलग तिसरा पराभव आहे. २०१४ मध्ये फुटबॉल वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात जर्मनीने अर्जेंटिनाचा १-० ने पराभव केला होता.
त्यानंतर मागच्यावर्षी कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत चिलीनेच त्यांना पराभूत केले होते. यावेळी फेव्हरेट असलेली अर्जेंटिना गतपराभवाचे उट्टे फेडेल असे वाटले होते. मात्र मोक्याच्या क्षणी ढेपाळण्याची आपली परंपरा कायम राखत अर्जेंटिनाने पुन्हा एकदा देशवासियांना निराश केले.
निर्धारीत ९० मिनिटांच्या खेळात गोलशून्य बरोबरीनंतर अतिरिक्त अर्ध्या तासाच्या खेळातही दोन्ही बाजूंची गोलशून्य बरोबरी कायम राहिली. अर्जेंटिनाचा गोलकिपर सर्जियो रोमेरो आणि चिलीचा गोलकीपर क्लाडीयो ब्राव्हो यांनी अतिरिक्त वेळेत अप्रतिम गोलरक्षण केले.
पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीच्या विडालचा पहिला प्रयत्न रोमेरोने रोखला. त्यानंतर मेस्सीला अर्जेंटिनाला आघाडी मिळवून द्यायची संधी होती. पण त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरुन गेला. त्यानंतर निकोलास आणि जावियरने कोणतीही चूक न करता गोल केले. त्यामुळे दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी होती.
त्यानंतर चार्ल्स आणि अग्युरोच्या गोलमुळे दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. त्यानंतर चिलीच्या जीनने गोल करत आघाडी ३-२ अशी वाढवली. अर्जेंटिनाच्या बिगलियाने मारलेली जोरदार किक ब्राव्होने हाताने अडवली. त्यानंतर चिलीच्या सिल्वाच्या किकने चेंडूला गोलजाळयाची दिशा दाखवली आणि चिलीच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला.