Copa América final : ब्राझील-अर्जेंटिना भिडणार जेतेपदासाठी, हायव्होल्टेज फायनलची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:44 AM2021-07-09T11:44:02+5:302021-07-09T11:46:14+5:30
रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी एकमेकांना आव्हान देतील.
ब्यूनस आयर्स : दोन फुटबॉलवेड्या देशांमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची अंतिम लढत सध्या जगभरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत आहे. नेमारचा ब्राझील आणि मेस्सीचा अर्जेंटिना संघ जेव्हा अंतिम लढतीत एकमेकांसमोर उभे राहतील, त्यावेळी जगभरातील फुटबॉलप्रेमी टीव्हीसमोर ठाण मांडून बसतील.
रियो दी जिनेरियो येथील माराका स्टेडियमवर हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी शनिवारी एकमेकांना आव्हान देतील. कोरोना महामारीमुळे ऐनवेळी ब्राझीलला या स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले आणि त्यानंतर देशभरात या यजमानपदाचा विरोध होत असतानाही ब्राझीलने अंतिम फेरी गाठली. गतविजेत्या ब्राझील व अर्जेंटिना यांनी मिळून आतापर्यंत एकूण ७ विश्वचषक आणि २३ कोपा अमेरिका स्पर्धा जिंकल्या. अर्जेंटिनाकडून सर्वाधिक आशा लिओनेल मेस्सीवर असतील. मेस्सीला राष्ट्रीय संघाकडून खेळताना एकही मोठे जेतेपद मिळवता आलेले नाही. २००७, २०१५ व २०१६ साली कोपा अमेरिका स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०१४ च्या विश्वचषक उपविजेत्या संघातही मेस्सीचा सहभाग होता.
अंतिम फेरीत ब्राझील वरचढ !
अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यामध्ये अनेक सामने झाले असले, तरी कोणत्याही स्पर्धेत ते केवळ चार वेळाच अंतिम फेरीत भिडले आहेत. १९३७ सालच्या दक्षिण अमेरिकी अजिंक्यपद अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलला २-० नेनमवले होते. यानंतर २००४ च्या कोपा अमेरिका अंतिम लढतीत ब्राझीलने पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारली होती. त्यानंतर एका वर्षाने जर्मनीत झालेल्या कॉन्फेडरेशन कप अंतिम लढतीत ब्राझीलने अर्जेंटिनाला ४-१ असा धक्का दिला होता. तसेच २००७ साली कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ब्राझीलने अर्जेंटिनावर ३-० असे वर्चस्व राखले होते.