कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धा आर्थिक संकटात
By admin | Published: June 24, 2015 11:37 PM2015-06-24T23:37:40+5:302015-06-24T23:37:40+5:30
चिली येथे सुरू असलेल्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेची जुळवाजुळव करताना, आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना
असुनशियन : चिली येथे सुरू असलेल्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेची जुळवाजुळव करताना, आयोजकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यंदा ही रक्कम कशीबशी उभारली जाईल; पण भविष्यात स्पर्धा आयोजनासाठी आर्थिक तरतूद करावीच लागेल, असा इशारा आयोजक दक्षिण अमेरिका फुटबॉल संघटनेने दिला आहे.
पॅरॉग्वेचे फुटबॉलप्रमुख अलेक्झांड्रो यांनी पत्रकारांशी चर्चा करताना आर्थिक संकट; तसेच स्पर्धा आयोजन आणि बक्षिसांच्या रकमेबाबतच्या वृत्ताचे खंडन केले; पण भविष्यात अशा स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी तरतूद नसल्याची कबुली दिली. ते पुढे म्हणाले, ‘विजेत्यांना बक्षिसांची रक्कम ही प्रायोजन आणि प्रसारण हक्क विक्रीतून होणाऱ्या नफ्यातून दिली जाते. त्यामुळे सध्याची स्पर्धा संकटमुक्त आहे असे म्हणावे लागेल.’
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघावर लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अमेरिका आणि स्विस तपास संस्थेने तपास सुरू केल्यापासून काही कंपन्यांचे अकाऊंट सील झाले आहे. अशावेळी या कंपन्या कोपा-अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे प्रायोजक म्हणून पैसा देऊ शकत नसल्याने हे संकट ओढवल्याचे वृत्त मीडियाने प्रकाशित केले होते. पॅराग्वे फुटबॉल संघटनेच्या प्रमुखाने दिलेल्या माहितीनुसार, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा कुठल्याही आर्थिक अडचणीत नाही. ही स्पर्धा युरोपातील चॅम्पियन्स लीच्या बरोबरीची स्पर्धा मानली जाते. (वृत्तसंस्था)