कोरोनाने संपवली क्रीडा क्षेत्रातील चौघांच्या आयुष्याची खेळी; १५ दिवसांतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:41 AM2020-03-31T00:41:07+5:302020-03-31T00:41:52+5:30
फ्रान्सिस्को गार्सिया, लॉरेन्झो सांझ, आझम खान, डेव्हिड एडवर्डस यांची अधुरी कहाणी
लंडन : कोरोनाच्या फैलावाने जगभरातील व्यवहारांप्रमाणे क्रीडाक्षेत्रसुध्दा ठप्प पडले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने गेल्या १५ दिवसातच क्रीडा क्षेत्रातील चार जणांची आयुष्याची खेळीसुद्धा संपवली आहे. त्यात नामांकित स्पेनमधील अॅटलेटिको पोर्टाडा क्लबचा युवा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया, फुटबॉल क्लब रियाल माद्रीदचे अध्यक्ष लॉरेन्झो सांझ, पाकिस्तानी महान स्क्वॅशपटू आझम खान आणि टेक्सास ए अँड एमचा माजी बास्केटबॉलपटू डेव्हिड एडवर्डस् यांचा समावेश आहे.
जगभरातील क्रीडा क्षेत्रातून कोरोनाबाधितांची माहित असलेली संख्या आतापर्यंत ८२ असून त्यापैकी चार जण मृत्युमुखी पडलेले आहेत. सर्वाधिक लागण फुटबॉल खेळाडूंना झाली असून आतापर्यंत फुटबॉलशी संबंधित ३६ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मुळात युरोपात फुटबॉलच्या माध्यमातूनच या विषाणूने शिरकाव केल्याचा अंदाज आहे. फुटबॉलपाठोपाठ बास्केटबॉलशी संबंधित २० जण पॉझिटिव्ह ठरले आहेत.
क्रीडा स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर होत असलेली प्रेक्षकांची गर्दी टाळण्यासाठी आणि खेळाडू व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेत बहुतांश क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. साधारण गेल्या दीड महिन्यापासून क्रीडा स्पर्धा, सराव व प्रशिक्षणे रद्द करण्यात येत असले तरीसुद्धा काही खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील पदाधिकारी व संघटकांना कोरोनाची बाधा झालेलीच आहे. त्याचा फैलाव आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे.क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदा कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकरण फेब्रुवारीत समोर आले. सायकलिंंगच्या युएई टूरमध्ये कोलंबियाचा सायकलपटू फर्नांडो गॅव्हिरिया याला अबुधाबी येथे इतर आठ जणांसोबत क्वारंटाईन करण्यात आले होते.
कोरोनाने क्रीेडा क्षेत्रातील पहिला बळी घेतला तो १५ मार्च रोजी. या दिवशी स्पेनमधील २१ वर्षीय युवा फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला आपला जीव गमवावा लागला. मलागा येथील अॅटलेटिको पोतार्डा अल्टा क्लबसोबत तो २०१६ सालापासून कनिष्ठ संघाच्या व्यवस्थापकपदी कार्यरत होता. या विषाणूमुळे मृत पावलेला गार्सिया सर्वात युवा ठरला.
तो आधीच कर्करोगाने ग्रस्त होता त्यामुळे त्याची प्रतिकारशक्तीे कमी पडली असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे होते. फ्रान्सिस्को अत्यंत गुणवान प्रशिक्षक होता. त्याचा मृत्यू आमच्यासाठी मोठा धक्का आहे असे त्याच्या क्लबचे अध्यक्ष पेपे ब्युएनो यांनी म्हटले आहे. नामांकित फुटबॉल क्लब रियाल माद्रीदचे अध्यक्ष लॉरेन्झो सांझ (वय ७६) यांचा २१ मार्च रोजी मृत्यू झाला. सांझ यांनी १९९५ ते २००० पर्यंत रियाल माद्रीदची सर्व सूत्रे सांभाळली. यादरम्यान रियालने दोन वेळा चॅम्पियन्स लीग विजेतेपदसुद्धा पटकावले.
लॉरेन्झो यांच्या अशा अकाली निधनामुळे व्यथित त्यांच्या मुलाने आपल्या व्टिटमध्ये म्हटले की, माझे वडील अलीकडेच निवर्तले. त्यांचा शेवट असा होणे अपेक्षित नव्हते. टेक्सास ए अँड एमचा माजी खेळाडू डेव्हिड एडवर्डस् हा कोरोनाशी लढत लढत मृत्युमुखी पडला. टेक्सास ए अँड एम संघानेच २३ मार्चला ही दु:खद वार्ता जाहीर केली.
एडवडस् हा १९८९-९० मध्ये जॉर्जटाउनसाठी खेळला. नंतर तो टेक्सास ए अँड एमसाठी खेळू लागला होता. त्यानंतर आता स्क्वॅशमधील सर्वात सफल खेळाडूंपैकी एक, पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॉशपटू आझम खान यांचे शनिवारी लंडन येथील एलिंग हॉस्पिटल येथे निधन झाले. मृत्युसमयी ते ९५ वर्षांचे होते. गेल्याच आठवड्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. आझम हे १९५६ पासून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले होते.
विविध खेळांचे कोरोनाबाधीत खेळाडू : फुटबॉलला सर्वाधिक फटका
बास्केटबॉल : लॉस एंजेल्स लेकर्सच्या दोन खेळाडू, लॉस एंजेल्स स्पार्कस संघाची खेळाडू सिडनी वाईज, बोस्टन सेल्टीक्सचा खेळाडू मार्कस स्मार्ट, ब्रुकलीन नेटस् संघाचे केव्हिन ड्यूरंटसह चार खेळाडू, उताह जाझचा खेळाडू रुडी गोबर्ट व डोनोव्हॅन मिचेल, न्यूयॉर्क निक्स संघाचा मालक जेम्स डोलन, रियाल माद्रिदचा बास्केटबॉलपटू ट्रे थॉम्पकिन्स,. डेट्राईट पिस्टन्सचा ख्रिस्तियन वूड, फिलाडेल्फिया ७६ इआरएसचे तीन जण, डेन्व्हर नगेटचा एक सदस्य, टेक्सास ए अँड एमचा माजी खेळाडू डेव्हिड एडवर्डस्, कोलोनीयल अॅथलेटिक असो. च्या पुरुष बास्केटबॉल अंतिम सामन्यावेळेचा एक अधिकारी
क्रिकेट : इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेल्स, टॉम करन आणि जेड डर्नबॅच
गोल्फ : दक्षिण आफ्रिकेचा व्हिक्टर लांज
बॉक्सिंग : तुर्कीश बॉक्सर सेरहट गुलेर व सैफुल्ला दमलुपिनार
आईस हॉकी : ओटावा सिनेटर्सचे दोन खेळाडू, एक समालोचक, कोलोरॅडो अॅव्हलांचे संघाचे दोन खेळाडू, सेंट लुईस ब्लूज संघाचा उद्घोषक जॉन केली.
बेसबॉल: यांकीज मायनर लीगचे दोन खेळाडू, बोस्टन रेड सॉक्सचा एक खेळाडू, निप्पोन प्रोफेशनल लीगमधील खेळाडू शिंतारो फुजिनामी, हयाटा इटो व केनिया नागासाका
स्क्वॅश : आझम खान (पाकिस्तान)
आॅलिम्पिक : जपान आॅलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष कोझो ताशिमा
सायकलिंग : कोलंबियाचा फर्नांडो गॅव्हिरिया
अमेरिकन फुटबॉल : न्यू ओरलिन्स सेंटस संघाचा सिन पेटन, सिएटल ड्रॅगन्सचा एक निनावी खेळाडू
फुटबॉल : रियाल माद्रीदचे अध्यक्ष लॉरेन्झो सांझ, विश्वविजेता डिफेंडर व एसी मिलानचा माजी फुटबॉलपटू पावलो माल्दिनी आणि त्याचा मुलगा डॅनियल, मेक्सिकन फुटबॉल लीग लिगा एमएक्सचे अध्यक्ष एन्रिक बोनिल्ला, युसी सॅम्पडोरियाचा खेळाडू बार्तोझ बेरेसझीन्स्की, अल्बीन एकदाल, मॉर्टेन थॉर्सबी, अंतोनियो गुमिना, मनालो गॅब्बियादीनी, फॅबियो देपाओली आणि संघाचे डॉक्टर अॅमेडो बल्दारी, फ्लोरेंटीना संघाचा फॉरवर्ड पॅट्रीक कुट्रोनसह तीन खेळाडू, युवेंटस संघाचा पावलो डायबाला, त्याची मैत्रीण, ब्लेईस मॅटीईडी आणि इतर दोन खेळाडू, व्हॅलेन्सियाचा एझेक्विल गॅरे, हॅनोव्हरचा डिफेंडर टिमो हुबर्स, चेल्सी क्लबचा कॅलम हडसन ओदोई, दक्षिण कोरियाचा ह्युन जून सुक, जर्मन डिफेंडर ल्युका किलियन्७ासह चार खेळाडू, फ्लोरेंटिना संघाचा जर्मन पेझेला व इतर दोन जण, युवैंटसचा डॅनिएल रुगानी, तुर्कीस्तानचा स्टार फुटबॉलपटू आणि बार्सिलोनाचा माजी गोलरक्षक रुस्तु रेकबर, फुटबॉल क्लब अर्सेनलचे व्यवस्थापक मिकेल अर्टेटा, फ्रान्सचा एलाक्विम मंगाला, इस्तांबूल फुटबॉल संघ गॅलाटासरायचे प्रशिक्षक फतिह टेरिम, मँेचेस्टर युनायटेड, एव्हरर्टन व बेल्यिमचा फुटबॉलपटू मारुआन फेलेनी. टेनिस: ब्राझीलचा थिएगो सेबोथ वाईल्ड.