८२४ बॅडमिंटनपटूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 05:04 AM2021-01-07T05:04:15+5:302021-01-07T05:04:35+5:30
भारतीय खेळाडू सरावास सज्ज, फिजिओची सेवा मिळणार
बँकॉक : थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी येथे आलेल्या भारतीयांसह सर्व ८२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सराव करण्यास सज्ज झाले आहेत. खेळाडूंना सरावाच्या वेळी फिजिओ तसेच ट्रेनरची सेवा घेता येणार आहे.
भारतीय खेळाडूंना खेळाडू, पंच, लाईन जज, बीडब्ल्यूएफ तसेच थायलंड बॅडमिंटन संघटनेचे अधिकारी, वैद्यकीय तसेच टीव्ही प्रसारण स्टाफसह ग्रीन झोनमध्ये स्थान देण्यात आले.
बँकाॅकमध्ये योनेक्स थायलंड ओपन आणि टोयोटा थायलंड ओपन अशा दोन सुपर सिरिज स्पर्धा १२ ते १७ तसेच १९ ते २४ जानेवारी या कालावधीत होणार असून, २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत विश्व टुर फायनल्सचे आयोजन होईल. त्यासाठी खेळाडूंना कोविड नियमांचे काटेकोर पालन करीत सरावास परवानगी बहाल करण्यात आली आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या दावेदारीसाठी पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, बी. साईप्रणीत हे खेळाडू असून, त्यांना सरावाची वेळ नेमून देण्यात आली आहे. दुपारी २ ते ३ यावेळेत भारतीय खेळाडूंना सरावाची मुभा असल्याचे बीएआयने ट्विट करताना म्हटले आहे.
शारीरिक सरावाची वेळ सायंकाळी ७ ते ८ ही असेल. सायनाने मंगळवारी फिजिओ आणि ट्रेनरची सेवा घेता येत नसल्याची तक्रार केली होती. यावर जागतिक बॅडमिंटन संघटनेकडून ६ जानेवारीपर्यंत काही दिवस खेळाडूंना आपापल्या खोलीतच ट्रेनरची सेवा घ्यावी लागेल, असे सांगण्यात आले. सराव सुरू झाल्यानंतर मात्र अटींसह ते फिजिओची सेवा घेऊ शकणार आहेत.