कोरोना, लॉकडाऊन, बहिष्काराच्या सावटात हिवाळी ऑलिम्पिक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 10:07 AM2022-02-05T10:07:38+5:302022-02-05T10:08:17+5:30
जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली.
बीजिंग : जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली. अनेक देशांच्या राजकीय बहिष्कारानंतरही चीनने गर्वाने ताकदीचे दर्शन घडविले. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थाॅमस बाक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्टेडियममध्ये (बर्ड नेस्ट) उद्घाटन सोहळा झाला. २००८ ला याच ठिकाणी ऑलिम्पिक पार पडले होते.
उद्घाटनासोबतच बीजिंग हे शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकचे एकाच ठिकाणी आयोजन करणारे जगातील पहिले शहर बनले. टोकियो ऑलिम्पिकपाठोपाठ कोरोना सावटात सहा महिन्यांत हे दुसरे ऑलिम्पिक आहे.
अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांच्या विरोधानंतरही जगातील अनेक नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. त्यात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. समारंभाआधी पुतिन आणि जीनपिंग यांच्यात चर्चा देखील झाली. गलवान खोऱ्यातील संघर्षात सामील असलेल्या सैन्यातील कमांडरला चीनने ध्वजधारक बनविल्याने भारताने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला.
कार्यक्रमात विविध नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, लाईट ॲन्ड साऊंड शो, आतषबाजी आणि चीनच्या संस्कृतीशी संबंधित झलक सादर करण्यात आली.
आरिफ खानने केले भारताचे नेतृत्व
उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व स्कीअर आरिफ खान याने केले. भारताचे राजदूत मात्र कार्यक्रमात अनुपस्थित होते. ३१ वर्षांचा आरिफ स्पर्धेत सहभागी एकमेव भारतीय खेळाडू आहे. आरिफने स्लालोम आणि जायंट स्लालोम प्रकारात पात्रता गाठली आहे. सोबत एक कोच, तांत्रिक अधिकारी आणि संघ व्यवस्थापक आहेत. आरिफच्या स्पर्धा १३ आणि १६ फेब्रुवारी रोजी होतील. भारतीय पथक २३ व्या स्थानावर स्टेडियममध्ये दाखल झाले. काश्मीरच्या बारामुल्ला येथे आरिफ वयाच्या १२ व्या वर्षांपासून या खेळात आहे. २०११ च्या द. आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदके जिंकली होती.