corona virus :मलाही झाली आहे कोरोनाची बाधा, जपानी आॅलिम्पिक समिती उपप्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:18 AM2020-03-18T04:18:13+5:302020-03-18T04:19:37+5:30
जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत.
टोकियो - जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानामुळे बहुतेक स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर, यंदाची आॅलिम्पिक स्पर्धा होणार की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. मात्र, मंगळवारी जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनी स्वत:हून आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जाहीर केले. यामुळे आता जपान ऑलिम्पिक स्पर्धेचे सुरक्षितपणे आयोजन करण्यात सक्षम आहे की नाही? यावर उलटसुलट चर्चा क्रीडाविश्वात रंगत आहेत.
एका निवेदनाद्वारे ताशिमा यांनी सांगितले की, ‘मी कोरोना विषाणू संक्रमणाची चाचणी केली होती आणि अहवालात मला या विषाणूची लागण झाल्याचे कळाले. मला हलकासा ताप होता. न्यूमोनियाचे लक्षण होते, पण आता मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या निर्देशांचे मी पालन करेन.’ या आधी जपानी अधिकारी सातत्याने आॅलिम्पिक स्पर्धा निर्धारित वेळापत्रकानुसार जुलै-आॅगस्टमध्ये होतील, असे सांगत होते. मात्र, आता खुद्द त्यांच्या आॅलिम्पिक समितीच्या उपप्रमुखांनाच कोरोनाची लागण झाल्याने, पुन्हा एकदा आॅलिम्पिक आयोजनावर शंका उपस्थित झाली आहे.
ताशिमा यांनी पुढे सांगितले की, ‘मी २८ फेब्रुवारीपासून व्यावसायिक दौऱ्यावर होतो. यावेळी सर्वप्रथम मी बेलफास्ट येथे गेलो आणि नंतर अॅमस्टरडॅम येथे गेलो. तिथे प्रत्येक जण गळाभेट घेत होते, हस्तांदोलन करत होते.’ यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तेथून ८ मार्चला जपानला परतले, अशी माहितीही ताशिमा यांनी दिली. (वृत्तसंस्था)